शिवसेना-भाजपचे पॅनेल मोडके-तोडके
By admin | Published: April 29, 2015 11:51 PM2015-04-29T23:51:21+5:302015-04-30T00:22:39+5:30
संजय मंडलिकांचा घरचा आहेर : सत्तारूढ गटाचा प्रचार प्रारंभ; बँक नंबर वन बनविण्याची घेतली शपथ
कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी विरोधी शिवसेना-भाजपने ओढून ताणून केलेले मोडके -तोडके पॅनेल असून, त्यांचा टिकाव लागणार नाही, अशी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी विरोधी पॅनेलची खिल्ली उडवली. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार प्रारंभ बुधवारी महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झालेल्या चुका सुधारत जिल्हा बँक देशात ‘नंबर वन’ करण्याची शपथ सर्वच नेत्यांनी घेतली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
मंडलिक म्हणाले, सतेज पाटील, विनय कोरे व आपण सत्तारूढ गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पॅनेलबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपणाला विचारले होते; पण विरोधाला विरोध म्हणून पॅनेल करत असल्याने आपण येणार नसल्याचे त्यांना सांगितले. विरोधी पॅनेल म्हणजे तांत्रिकदृष्ट्या मोडके-तोडके व ओढून-ताणून उभे केलेले पॅनेल आहे. त्याचा टिकाव लागणार नाही, अशा शब्दांत शिवसेना-भाजपच्या पॅनेलची त्यांनी खिल्ली उडवली. विरोधी पॅनेल थांबवून आमच्याबरोबर आले त्याबद्दल संजय मंडलिक यांचे आभार मानत के. पी. पाटील म्हणाले, पी. एन. पाटील व हसन मुश्रीफ हे सांगतील त्याप्रमाणे कारभार होईल. कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यात बँकेचे योगदान असून दोष बाजूला ठेवून कामकाज करा. आघाडी करताना कोणाला किती जागा मिळाल्या यापेक्षा बँकेचा कारभार कोणत्या दिशेने करायचा यावर एकमत झाल्याचे सांगत पी. एन. पाटील म्हणाले, उस्मानाबाद, नांदेड बँकेसारखी आमची अवस्था नव्हती, प्रशासक आले त्यावेळी राज्य बँकेकडे आमच्या ५०० कोटींच्या ठेवी होत्या. केवळ एन.पी.ए. वाढला म्हणून प्रशासक आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. त्याला कर्जे मिळाली नाहीत, बँकेच्या चाव्या शेतकऱ्यांच्या हातात देण्यासाठी आघाडीला सहकार्य करा.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘शेतकऱ्यांची अर्थवाहिनी’ व्यवस्थित करण्यासाठी आम्ही पंचसूत्रीचा वापर करणार असून, चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ‘गोकुळ’, ‘राजाराम’मध्ये मतदान मोठ्या प्रमाणात बाद झाल्याने ठरावधारकांना ट्रेनिंग देण्याची सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. आमदार संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, जयवंतराव आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. नामदेवराव भोईटे, धैर्यशील पाटील, गणी फरास, अभिजित तायशेटे, मधुकर जांभळे, बाळासाहेब सरनाईक उपस्थित होते. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
वसुलीबाबत प्रशासकांचा दिखावाच
दत्त-आसुर्ले कारखाना अवसायनात काढल्याने बँक एनपीएमध्ये गेली. त्यानंतर प्रशासक आले; पण गेल्या सहा वर्षांत प्रशासकांनी कोणत्याही प्रकारची वसुली न करता केवळ दिखावा केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
देसाई, सातपुतेंचा पाठिंबा
पतसंस्था गटातील गजानन देसाई (शिरोळ), तर अनुसूचित जाती गटातून निवृत्ती सातपुते (सांगरुळ) यांनी माघार घेत सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला.
संभाजीराजेंसारखी अवस्था नको
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण असेच सर्वजण एकत्र येऊन संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा दिला होता. पण निकाल वेगळाच लागला, तसे गाफील राहू नका, असा इशारा प्रा. पाटील यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला.
मंडलिकांच्या
उमेदवारीने आनंद
प्रक्रिया संस्था गट हा माझे नेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचा मतदारसंघ. त्यामुळे आम्ही संस्था वाढविलेल्या आहेत. या मतदारसंघातून त्यांच्यानंतर संजय मंडलिक यांना संधी मिळाल्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विशेष आनंद झाल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
केडीसीसी बँक निवडणूक--
कोरे, बंटी,
महाडिक अनुपस्थित
मेळाव्याला विनय कोरे, सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह आजरा, चंदगड, शिरोळ, गगनबावडा तालुका विकास संस्था गटांतील उमेदवार उपस्थित नव्हते.