शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस-शिवसेना एकत्र?
By admin | Published: March 13, 2017 11:20 PM2017-03-13T23:20:32+5:302017-03-13T23:20:32+5:30
पंचायत समितीचे सत्ताकारण : आज सभापती, उपसभापतिपदाची निवड
जयसिंगपूर : शिरोळ पंचायत समितीतील सत्तेचा गुंता जवळपास संपुष्टात आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज, मंगळवारी सभापती, उपसभापतिपदाची निवड होत आहे. सभापती पद दोन्ही काँग्रेसकडे, तर उपसभापती पद शिवसेनेकडे, असा फॉर्म्युला ठरला असून, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण झाले होते. काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, स्वाभिमानी चार, शिवसेना दोन, भाजप व अपक्ष प्रत्येकी एक, असे पंचायत समितीतील बलाबल आहे. पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला संधी निर्माण झाली होती. एकतर शिवसेनेची संगत अथवा स्वाभिमानीशी मिळते-जुळते घ्यावे लागेल, अशी परिस्थिती दोन्ही काँग्रेससमोर होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेपासून दूर ठेवायचे झाले, तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून हिरवा कंदील मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेनेसोबत शनिवारी बैठक झाली. यामध्ये सत्ता स्थापनेचा निर्णय झाल्याचे समजते.
आज, मंगळवारी सभापती व उपसभापतिपदाची निवड होणार आहे. प्रशिक्षणार्थी तहसीलदार एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा सभागृहात दुपारी दोन वाजता ही निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या, असून पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र आल्याचे समजते. (प्रतिनिधी)
सदस्य सहलीवरशनिवारी (दि.११) दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची बैठक झाल्यानंतर रविवारी दोन्ही पक्षातील पंचायत समिती सदस्य सहलीवर रवाना झाले.
आज मंगळवारी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहलीवर गेलेले सदस्य शिरोळमध्ये सकाळी दाखल होणार आहेत.
निवड कोणाची
शिरोळ पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही काँग्रेसकडे पाच महिला व एक पुरुष सदस्य आहे. पहिली संधी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्याला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. तर उपसभापतिपदी कोण बाजी मारणार? याकडेही लक्ष लागून राहिले आहे.