एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार?
By admin | Published: March 16, 2017 12:25 AM2017-03-16T00:25:37+5:302017-03-16T00:25:37+5:30
जिल्हा परिषद : कट्टर शिवसैनिकांसह आमदार समर्थकांमध्ये उत्सुकता
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
कधी नव्हे ते यश शिवसेनेच्या पदरात पडले असताना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार याचा निकाल २१ मार्चला लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांसह आता आमदार समर्थक शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यसंख्येमध्ये दहा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, त्या-त्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या सोयीनुसार कुणाशी आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय घेतल्याने अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही सर्वत्र सोयीची भूमिका घेतली आहे. एकीकडे मूळची शिवसेना आणि नंतर आमदारांची शिवसेना असे दोन गट काही ठिकाणी स्पष्टपणे दिसत असतानाही जिल्ह्याच्या पातळीवर निर्णय घेत शिवसेनेने जिल्हा परिषदेत मिळविलेले यश उल्लेखनीयच आहे.
गेली अनेक वर्षे सत्तेत असलेली काँगे्रस १४ जागांवर थांबली. महसूलमंत्री पदासारखे वजनदार मंत्रिपद असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपला १४ जागा मिळवल्या. अनेक सत्तास्थाने ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीने ११ जागा पटकावल्या. त्या तुलनेत पक्षाकडून फारसे बळ मिळाले नसताना केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर आणि स्थानिक विधानसभा मतदारसंघाचा विचार करत सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, तीनही जिल्हाप्रमुख आणि पाच आमदार यांनी जोडण्या घालत मिळविलेले दहा जागांचे यश कौतुकास्पद आहे.
मात्र, हीच शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून एकीकडे मंडलिक यांची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे आमदारही आपापल्या विधानसभेच्या अडचणी कशा कमी होतील, याची काळजी करताना दिसत आहेत. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर शिवसेनेचे दहाच्या दहा सदस्य एकाच आघाडीसोबत राहतील याची शाश्वती नाही. सभापती निवडीमध्ये शिवसेनेने एकीकडे राष्ट्रवादी, दुसरीकडे काँग्रेस यांच्याशी युती करत पदे मिळवली आहेत. याच पद्धतीने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
एकमेव आदेश, ‘मातोश्री’चा आदेश !
या विचित्र परिस्थितीत केवळ आणि केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मार्ग काढू शकतात. जिल्ह्यातील शिवसेनेत आधीच फूट आहे. त्यात पुन्हा आणखी फूट दिसू नये, यासाठी केवळ त्यांनीच कुठल्या आघाडीसोबत राहायचे आणि तेही दहाजणांनी राहायचे असे सांगत आदेश दिला तरच शिवसेनेतील संभाव्य फूट टळेल, परंतु जिल्हा परिषदेपेक्षा आगामी विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी सोयीची भूमिका घेण्याची परवानगी जर त्यांनी दिली, तर सेनेत फूट अटळ मानली जात आहे.