लोकसभेला उसना उमेदवार नको, कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या मेळाव्यात आग्रही मागणी
By समीर देशपांडे | Published: July 8, 2023 03:58 PM2023-07-08T15:58:05+5:302023-07-08T16:24:27+5:30
कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू ...
कोल्हापूर : प्रत्येकवेळी शिवसेनेने लोकसभेला कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार दिला. सगळे जण खासदार झाले परंतू शिवसेनेला सोडून गेले. त्यामुळ कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या लोकसभेला उसना उमेदवार नको अशी आग्रही मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूरमधील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका करण्यात आली.
संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनमध्ये हा मेळावा झाला. यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूरमधून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली.
यावेळी मुरलीधर जाधव म्हणाले, आम्ही शिवसैनिक काही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. शिवसेना सोडल्यानंतर कोण बरोबर आहे की नाही याचा विचार न करता खासदार धैर्यशील माने आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोर्चा काढला. १५ दिवसात माने शिवसेनेत आले आणि खासदार झाले. आता यापुढे हे चालणार नाही.
विजय देवणे म्हणाले, आम्ही संघटनेसाठी रक्ताचे पाणी करतो, पोटात अन्न नसताना शिवसैनिक रस्त्यावर उतरतो म्हणून संघटना जिवंत आहे. अशावेळी उमेदवारीला मात्र दुसऱ्याला प्राधान्य असे यावेळी तरी करू नका. यावेळी शहरप्रमुख रवि इंगवले, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांची भाषणे झाली. आपल्या सर्वांच्या भावना मला समजल्या आहेत. आपल्याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. त्यामुळे तो देतील तो निर्णय स्वीकारून प्रत्येक जागा लढवण्यासाठीची तयारी करा असे आवाहन यावेळी दुधवडकर यांनी केले.