शिवसेना महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत
By admin | Published: February 10, 2017 11:51 PM2017-02-10T23:51:59+5:302017-02-10T23:51:59+5:30
परिवहन सभापती : नियाज खान यांना संधी देणार; ‘स्थायी’ च्या निवडीत केलेल्या मदतीची परतफेड
कोल्हापूर : महानगरपालिकेतील राजकारणात शह देण्याच्या हेतूने भाजपला त्यांची औकात दाखविल्याचे बक्षीस म्हणून काँग्रेस - राष्ट्रवादीने शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद बहाल केले. यंदा परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे जाणार असतानाही ते शिवसेनेला सोडले गेले. त्यामुळे नियाज आसिफ खान यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेच्या चार सदस्यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप-ताराराणी आघाडी यापैकी कोणालाही मदत न करता स्वतंत्र बसण्याची भूमिका घेतली होती तरीही ‘शिवसेनेचे चार सदस्य चार दिशेला’ असल्याचे प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट झाले. हसिना फरास महापौर होत असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी हा आपला शत्रू पक्ष असल्याने त्यांना मदत केली जाणार नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले होते. स्थायी समिती सभापती निवडीवेळी मात्र शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी उघडपणे काँग्रेसच्या संदीप नेजदार यांना निर्णायक मत देऊन सभापती केले. या मदतीची परतफेड काँग्रेस व राष्ट्रवादीने परिवहन सभापती निवडणुकीत करण्याचे ठरविले असून शिवसेनेच्या नियाज खान यांना हे पद सोडले. शुक्रवारी परिवहन सभापतिपदासाठी शिवसेनेच्या नियाज खान यांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने एकमेव अर्ज भरला तर खान यांच्या विरोधात भाजप-ताराराणी आघाडीकडून शेखर श्रीकांत कुसाळे यांनी अर्ज भरला. चंद्रकांत पांडुरंग सूर्यवंशी यांनी डमी अर्ज भरला आहे. सभागृहात काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे २, भाजपचे २, ताराराणी आघाडीचे ३ तर शिवसेनेचा १ सदस्य आहे. हे संख्याबळ पाहता नियाज खान यांना ८ तर शेखर कुसाळे यांना ५ मते मिळणार आहेते. सोमवारी (दि. १३) सकाळी अकरा वाजता सभापतिपदासाठी परिवहन समितीची बैठक होत आहे. (प्रतिनिधी) महापालिकेत गटनेते बदलाच्या हालचाली महापौर-उपमहापौरांसह सर्वच प्रमुख पदाधिकारी बदलल्यानंतर आता राजकीय पक्षांचे गटनेते बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सुनील पाटील दोन दिवसांत गटनेतेपदाचा राजीनामा देणार आहेत, तर शिवसेनेचे गटनेते नियाज खानही गटनेतेपदाचा राजीनामा देणार आहेत. नगरसेवक अभिजित चव्हाण यांना शिवसेनेचे गटनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. ताराराणी आघाडी, भाजपचे गटनेते बदलण्याची शक्यता कमी आहे.