शिवसेना नगरसेवकांना क्षीरसागर यांची धमकी

By Admin | Published: April 21, 2016 12:48 AM2016-04-21T00:48:21+5:302016-04-21T00:48:21+5:30

महापालिकेत तणाव : भाजपला मदत केल्याचा राग; गद्दारी केली तर जिवंत सोडणार नाही

Shiv Sena corporators threaten Kshirsagar | शिवसेना नगरसेवकांना क्षीरसागर यांची धमकी

शिवसेना नगरसेवकांना क्षीरसागर यांची धमकी

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यात शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करून त्यांच्याच पाठिंब्यावर प्रभाग समिती सभापती निवडणूक लढविण्याचा डाव शिवसेनेच्या चार नगरसेवकांच्या अंगलट आला. शिवसेनेच्या या नगरसेवकांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेत जाऊन चार-चौघांत फैलावर तर घेतलेच शिवाय ‘याद राखा, पक्ष सोडून गेलात, गद्दारी केलीत तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीच दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसंग शोभेल अशा थाटात आमदार राजेश क्षीरसागर पन्नासहून अधिक शिवसैनिकांसह महापालिकेत आले. त्यांनी शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांची केबिन गाठली. प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया संपवून चारही नगरसेवक खान यांच्या केबिनमध्ये येऊन बसले होते. आमदार क्षीरसागर यांनी या चारही नगरसेवकांना चांगलेच खडसावले. ‘एक नंबरचा शत्रू’ असलेल्या भाजपसोबत आघाडी करायची नाही, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना का आघाडी केलीत, राहुल चव्हाण यांनी का निवडणूक लढविली, असा जाब विचारला व चक्क धमकीच दिली. शिवसेनेला संपवायला निघालेला भाजप हा प्रमुख शत्रू आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी हाही शत्रू आहे, म्हणूनच त्यांच्यापासून दूर राहून स्वतंत्र अस्तित्व दाखवून द्यायचे आहे, तसे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आले आहेत. याबाबत कल्पना देऊनही जर तुम्ही पक्षाशी गद्दारी करणार असाल तर खपवून घेणार नाही, अशा शब्दांत खडसावले. वळंजूंच्या विरोधात मी प्रचार केला. गद्दारी केली नाही याची आठवण ठेवा, अशा शब्दांत सुनावले.
ठोकण्याच्या इराद्याने आले, पण ...
४पक्षाशी गद्दारी केल्यामुळे संतप्त झालेले आमदार क्षीरसागर हे चार नगरसेवकांना ठोकण्याच्या इराद्यानेच पन्नासहून अधिक शिवसैनिकांना घेऊन महानगरपालिकेत आले होते; परंतु नियाज खान यांनी निवडणुकीतून माघार घेतली तर राहुल चव्हाण यांनी निवडणूक लढवूनही त्यांचा चिठ्ठीत पराभव झाल्यामुळे आमदारांनी ठोकण्याऐवजी धमकावण्यावरच प्रकरण थांबविले; परंतु या प्रकाराने महानगरपालिका विठ्ठल रामजी शिंदे चौकात तणावपूर्ण वातावरण बनले होते.
४चारपैकी एकाही नगरसेवकाने आमदारांच्या शाब्दिक हल्ल्याला विरोध केला नाही. गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. एखाद्या निवडणुकीत नगरसेवकांना धमकावण्याचा हा महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे.
अर्ज भरले तेव्हाच ताकीद दिली
प्रभाग समिती सभापतिपदासाठी नियाज खान व राहुल चव्हाण यांनी जेव्हा भाजप-ताराराणी आघाडीतर्फे अर्ज भरले तेव्हाच त्यांना पक्षादेश सांगितला होता. ते दोघे माघार घेतील, असे वाटले; प्रत्यक्षात राहुल चव्हाण यांनी माघार घेतली नाही. नियाज खान यांनी माघार घेतली म्हणूनच त्यांना समज दिल्याचे आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेच्या नगरसेवकांची भूमिका
महापालिकेत निधी वाटपामध्ये जो अन्याय केला होता त्याला चोख उत्तर देण्यासाठी चुकीचे असूनही प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजपला मदत केली. आमच्याकडून कोणतेही गैरकृत्य घडलेले नाही. भविष्यात आम्ही शिवसेनेच्याच ध्येयधोरणांनुसार व ‘मातोश्री’च्या आदेशानुसार काम करीत राहू, अशी ग्वाही शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण व प्रतिज्ञा निल्ले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Shiv Sena corporators threaten Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.