शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:39 PM2021-06-13T18:39:39+5:302021-06-13T18:41:40+5:30
CoronaVIrus Shivsena Kolhapur : शिवसेना शहर कार्यालय येथे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने पाच लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
कोल्हापूर : शिवसेना शहर कार्यालय येथे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने पाच लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
यानंतर सेवाभावी संस्थांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान केले. गांधी मैदान येथील कै. विष्णुपंत इंगवले कोविड सेंटरला एक लाख, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरला पन्नास हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोविड सेंटरला पन्नास हजार अशी मदत करण्यात आली.
कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, अरुण सावंत, सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, मणेर मस्जिद ट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर उपस्थित होते.