शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात, बेळगावमध्ये प्रवेश करताना कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 09:45 PM2022-11-01T21:45:54+5:302022-11-01T21:47:24+5:30
Vijay Devane : भव्य निषेध मोर्चासाठी जाणारे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
- बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस सीमा भागातील मराठी बांधवांच्या वतीने काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी काढण्यात येणाऱ्या भव्य निषेध मोर्चासाठी जाणारे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
काळया दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने बेळगाव मध्ये भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मराठी बांधवांना समर्थन देण्यासाठी प्रतिवर्षी कोल्हापूर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते बेळगाव ला जाण्याचा प्रयत्न करतात. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार कार्यकर्त्यांसह सोमवारी बेळगावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना कोगनोळी येथून कर्नाटक पोलिसांनी परत पाठवले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पुन्हा बेळगावच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला त्याही वेळी कोगनोळी येथील कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवून पुन्हा महाराष्ट्रात पाठवले.
त्यानंतर विजय देवणे व काही प्रमुख कार्यकर्त्यांनी खुश्कीच्या मार्गाने बेळगाव मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ते खुशीच्या मार्गाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या शिनोळी पर्यंत पोहोचले. या ठिकाणी अगोदरच मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलिसांनी विजय देवणे यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना महाराष्ट्राच्या दिशेने पाठविण्यात आले.