शिवसेना अखेर दोन्ही काँग्रेससोबतच
By admin | Published: March 14, 2017 01:30 AM2017-03-14T01:30:51+5:302017-03-14T01:30:51+5:30
जिल्हा परिषदेचे सत्ताकारण : भाजपला दे धक्का; ‘मातोश्री’च्या आदेशाची प्रतीक्षा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात शिवसेना दोन्ही काँग्रेससोबतच राहणार असे स्पष्ट संकेत सोमवारी मिळाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तसेच आदेश दिले असल्याचे वृत्त होते; परंतु त्यास अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र, रविवार-सोमवारी झालेल्या घडामोडी पाहता हा पक्ष भाजपमुक्त जिल्हा परिषद करण्यासाठी आग्रही असल्याचे समजले.
फक्त काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आल्यास त्यास आमदार चंद्रदीप नरके यांचा विरोध राहू शकतो. त्यांची कोंडी होत आहे, परंतु एकदा ‘मातोश्री’वरूनच स्पष्ट आदेश आल्यावर त्यांना पक्षाबरोबर राहावे लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘मातोश्री’वरून वेगळा काही आदेश येण्याची वाट न पाहता दोन्ही काँग्रेसबरोबर चर्चाच सुरू करावी, अशाही हालचाली पक्षाच्या पातळीवर सुरू होत्या.
राज्याच्या राजकारणात आणि कोल्हापूर महापालिकेतही शिवसेनेने भाजपच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने शरणागती पत्करून शिवसेनेचा महापौर होण्यास अप्रत्यक्ष मदत केली असली, तरी शिवसेनेचा भाजपवरील राग कमी झालेला नाही. मुंबईत भाजपने सौम्य भूमिका घेतल्याने राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपला मदत करेल असे भाजपला वाटत होते, परंतु तसे घडलेले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांच्या सभागृहात दोन्ही काँग्रेसकडे २५ सदस्य आहेत. त्यांना आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या आघाडीच्या दोन सदस्यांचा पाठिंबा आहे. शिंगणापूरमधून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारही काँग्रेससोबतच राहतील असे चित्र आहे. आवाडे गटाचे दोन सदस्य आहेत. पी. एन. पाटील यांच्या मुलाचे नाव पुढे आल्यास ते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दहा सदस्य आहेत. त्यांनी एकत्रित पाठिंबा दिल्यास काँग्रेसचे संख्याबळ ३८ वर जाते. आवाडे गट पक्षाबरोबर राहिल्यास ही संख्या ४० वर जाऊ शकते. शिवाय मावळत्या सभागृहात स्वाभिमानी संघटना काँग्रेससोबतच होती. त्यांचे दोन सदस्य आहेत. खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे प्रेम पाहता ते काँग्रेससोबतच राहणार हे स्पष्ट आहे. आमदार चंद्रदीप नरके यांना मानणारे दोन सदस्य आहेत. शियेमधून निवडून आलेली महिला सदस्या माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांना मानणारी आहे. पक्षाचा निर्णय झाल्यास ती काँग्रेससोबतच राहू शकते. आमदार सत्यजित पाटील व आमदार नरके यांची आघाडी होती, परंतु भाजपकडे गेल्यास तिथेही विनय कोरे यांना या दोघांचाही विरोध आहे. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ आणि पक्षाकडून काही सूचना आल्यास त्यांना त्यापासून बाजूला जाऊन काही वेगळी भूमिका घेता येणार नाही, असे पदाधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे.
रविवारी मी कोल्हापुरात होतो. पाच आमदार, तीन जिल्हाप्रमुख व सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांच्याशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. स्थानिक पातळीवर जे शिवसेनेच्या फायद्याचे आहे, त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. आमची तीच लाईन आहे, परंतु जी चर्चा झाली ती मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविणार आहे.
- अरुण दुधवडकर, संपर्क नेते शिवसेना
काँग्रेसकडून राहुल पाटील उमेदवार निश्चित
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसच्यावतीने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून राहुल पाटील यांचे नाव सोमवारी निश्चित झाले. राहुल हे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आहेत. -/वृत्त २
२१ मार्चला अध्यक्ष निवड
अध्यक्ष निवड २१ मार्चला होत आहे. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया होईल. सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दुपारी तीन वाजता सभा होईल. त्यामध्ये माघार व हवी असेल तर निवडणूक होईल.
शिवसेनेचा कल कॉँग्रेसकडेच बहुमताचा आकडा आमच्याकडेच : दोन्ही कॉँग्रेसचा दावा भाजपचीच सत्ता येणार : चंद्रकांतदादा पाटील हॅलो १
संभाव्य पक्षीय बलाबल
(बहुमतासाठी आवश्यक सदस्य : ३४)
काँग्रेस - १४ राष्ट्रवादी - ११
शिवसेना - १०
शाहू आघाडी - ०२
अपक्ष - ०१ (शिंगणापूर)
आवाडे गट - ०२
स्वाभिमानी शेतकरी संघटना - ०२
भाजप आघाडी
भाजप - १४ जनसुराज्य - ०६
युवक क्रांती आघाडी - ०२
ताराराणी आघाडी - ०३