कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान
By विश्वास पाटील | Published: July 20, 2022 12:11 PM2022-07-20T12:11:46+5:302022-07-20T12:12:54+5:30
मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न.
विश्वास पाटील
कोल्हापूर : शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात पक्षाला मोठा हादरा बसला. हे दोघेही शिवसेनेचे मूळचे हाडाचे कार्यकर्ते नव्हते. त्यांच्या घराण्याची राजकीय वाटचाल मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाणामुळेच त्यांना खासदारकी मिळाली परंतु एकाचवेळी दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना राम राम केल्याने ठाकरे यांच्यासमोर राज्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे आव्हान असेल.
शिवसेनेला या दोन्ही जागांसाठी ताकदीचे उमेदवार शोधावे लागतील ते या घडीला तरी पक्षाकडे नाहीत. पक्षाकडे आज एकही आमदार नाही. एकमेव आमदार प्रकाश आबिटकरही शिवसेनेसोबत गेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढायचा निर्णय झाल्यास कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादीही दावा सांगू शकते. कारण मूळ ही जागा त्याच पक्षाची आहे. मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न आहेच.
हातकणंगले मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही तिथे रिंगणात असतील. या मतदार संघातीलही शिवसेनेचे एकमेव सहयोगी आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेपुढचे आव्हान या मतदार संघातही खडतर आहे. शिरोळची विधानसभा व हातकणंगलेची लोकसभा अशी काही देवघेव करून त्यांना पुढील रणनीती ठरवावी लागेल. महाविकास आघाडी होणार की शिवसेना स्वतंत्र लढणार यावर सगळ्या घडामोडी अवलंबून आहेत. तूर्त दोन्ही खासदारांनी ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे एवढे मात्र नक्की.
मंडलिक यांचे वडील पाचवेळा राष्ट्रवादीचे खासदार होते. त्याची हयात काँग्रेस व राष्ट्रवादीत गेली. परंतु शेवटच्या २००९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली व तेव्हापासून मंडलिक गट शिवसेनेच्या सावलीत आला. संजय मंडलिक यांना शिवसेनेने दोनदा उमेदवारी दिली. पक्षात आमदारांची बंडाळी माजल्यावर मंडलिक मातोश्रीवर ठाण मांडून होते. जिल्ह्यात काढलेल्या मोर्चातही ते पुढे होते. जे सोडून गेले ते बेन्टेक्स पुढारी होते, शिल्लक राहिले ते अस्सल सोने अशी बोचरी टीकाही त्यांनी केली परंतु शेवटी आठ दिवसांत ते स्वत:च शिंदे गटात गेले.
खासदार माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांचा पराभव झाला म्हणून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्यांनी लगेच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. या पक्षाच्या चिन्हावर त्या दोनवेळा खासदार झाल्या. पक्षाने त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष केले होते. परंतु ही जागा आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या वाट्याला गेल्यावर धैर्यशील माने हे शिवसेनेत गेले.
पहिल्याच लढतीत त्यांना यश मिळाले. तेदेखील आमदार फुटीच्या काळात मातोश्रीवर होते. त्यांनीही मतदार संघातील विकासकामांचे कारण देऊनच शिंदे गटाशी सोबत केली आहे. विकासकामे की राजकीय निष्ठा यापैकी काय निवडायचे, हाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेपुढील कळीचा प्रश्न असेल. त्यावर या दोघांचे राजकीय भवितव्य निश्चित होईल