इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:18 PM2022-08-02T14:18:23+5:302022-08-02T14:20:50+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ.

Shiv Sena leader Aditya Thackeray venomous criticism of rebel MLAs from Kolhapur | इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Next

कोल्हापूर : आम्ही या सर्वांना प्रेम दिलं, संपूर्ण विश्वास ठेवला, मानाची पदं दिली. इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं. तरीही यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हीच सांगा आमचं नेमकं काय चुकलं, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे मिरजकर तिकटीला झालेल्या सभेत शिवसैनिकांना विचारला.

रात्री भर पावसात आदित्य यांनी व्यासपीठावरून खाली येऊन उपस्थितांशी संवाद साधला. एकीकडे आपली बाजू मांडतानाच हा माणुसकीचा घात असल्याचे सांगत शिंदे गटाच्या आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. या सभेला जल्लोषी प्रतिसाद मिळाला. या सभेत कोल्हापूर आणि निपाणीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

फडफडणारे भगवे ध्वज, शिवसेना गीत आणि एकापेक्षा एक आक्रमक भाषणे सुरू असताना ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागत स्वीकारल्यानंतर सर्वांना अभिवादन करून आदित्य भर पावसात खाली आले. त्यांनी एका खुर्चीवर उभारूनच आपले अर्ध्या तासाचे भाषण पूर्ण केले. शिवसैनिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी साधलेल्या शिवसैनिकांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे आदित्य यांना दाद दिली.

ठाकरे म्हणाले, हे बंड आहे, उठाव असे म्हणतात. परंतु हे सर्व जण गद्दार आहेत आणि गद्दार हीच त्यांची ओळख राहणार आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा, वाढतच चाललेली भूक यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. गेलाच आहात तर जा. पण तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा हे माझे आव्हान आहे.

ठाकरे म्हणाले, ज्यांनी कोरोना काळात चांगले काम केले, ज्यांच्या काळात जातील दंगली झाल्या नाहीत. ते उध्दव ठाकरे आणखी मोठे झाले तर आपले काय अशी भीती काही जणांना वाटत होती. यातूनच हे घडले.

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, काही लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी बाजूला गेले. परंतु जनता, शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे. देवमाणसाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला आहे. मी हे आजारी असताना पुष्पगुच्छ घेऊन दवाखान्यात भेटायला गेलो. परंतु उशीखाली यांनी खंजीर ठेवला होता हे मला माहिती नव्हते, असा टोला पवार यांनी राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, विशाल देवकुळे यांचीही भाषणे झाली. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख रवी इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सभेला आदेश बांदेकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, नियाज खान, महेश उत्तुरे, नवेज मुल्ला, बाजीराव पाटील, राजू यादव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले..

गद्दारांमधील काही जणांना फसवून नेण्यात आलं आहे. त्यांनाही आता खरोखरच आपण उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटत असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

साडेतीन गद्दार..

खासदार विनायक राऊत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ आहे. आजऱ्यात एकाचा पंचनामा केला. इथंही एक अर्धवटराव आहे. नकली धर्मवीरही आहे. आनंद दिघे खरोखरच धर्मवीर होते. हे नकली धर्मवीर दिल्लीला चाटूगिरी करायला निघाले आहेत. केवळ आणि केवळ उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी हा सर्व डाव आहे.

प्रचंड उत्साह

आदित्य ठाकरे यांच्या या सभेवेळी उपस्थितांचा प्रचंड उत्साह जाणवत होता. घोषणा, फुटीरांबद्दल शेरेबाजी शेवटपर्यंत सुरू होती. ठाकरे यांनी अतिशय सहज पध्दतीने संवाद साधत, प्रश्न विचारत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: Shiv Sena leader Aditya Thackeray venomous criticism of rebel MLAs from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.