काँग्रेसला मदत करण्यासाठी शिवसेनेचे नेते बेळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:46+5:302021-04-16T04:25:46+5:30
बेळगाव : शिवसेनेचे नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी आले नसून समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर गोळी चालवून ...
बेळगाव : शिवसेनेचे नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी आले नसून समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. भाजपची मते फोडण्यासाठी समितीचा उमेदवार उभा करण्यात आला आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हिंडलगा येथे गुरुवारी सायंकाळी भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उमेदवार मंगला अंगडी यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री उमेश कत्ती तसेच भाजपची अन्य स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती.
फडणवीस म्हणाले की, मी येथे निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही. तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. कारण येथील मराठी माणसाने लोकसभेच्या चार निवडणुकांमध्ये सातत्याने सुरेश अंगडी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना संसदेत पाठविले आहे. त्यामुळे मंगलाताईंसाठी त्यांच्याकडे मते मागण्याची गरज नाही, ते निश्चितपणे भाजपलाच मते घालतील. मी येथे का आलो तर माझे मित्र संजय राऊत या ठिकाणी आल्यामुळे मला यावच लागलं. मला पहिल्यांदा वाटलं की, ते मराठी माणसांसाठी आले असावेत; परंतु नंतर लक्षात आलं की, महाराष्ट्र एकीकरण समितीने कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा केलेला नाही. मग यावर्षी का उभा केला? याचे कारण हे आहे की राऊत साहेब महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करत आहेत. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही. 'ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला गुण नाही तर वाण लागला' अशी महाराष्ट्रात काँग्रेस सोबत राहिल्याने शिवसेनेची अवस्था झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्याचा हा जो प्रकार सुरू आहे, त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मी येथे आलो आहे. तेव्हा मराठी मावळ्यांनो, सावध व्हा आणि आधीप्रमाणे भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. बेळगावच्या पोटनिवडणुकीमध्ये लक्ष घालणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनता सध्या कोरोनाच्या संकटात सापडली आहे. त्यांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही आहे या सर्व गोष्टींची चिंता करावी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्याला खांदा लावून आम्हीदेखील काम केले आहे. मात्र, आता समितीमध्ये जुने लोक दिसत नाहीत. संघर्ष केलेली एकही व्यक्ती दिसत नाही. याचा अर्थ एकच आहे या पोटनिवडणुकीतील मते खाण्यासाठी -फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर उमेदवार उभा करण्यात आला आहे. तथापि, सर्वांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपला मतदान करून मंगला अंगडिया यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार संजय पाटील आदींचीही भाषणे झाली.
फोटो : देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री फोटो : भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा प्रचार करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री जगदीश शेट्टर, उमेश कत्ती, आदी.