कोल्हापूरच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:23+5:302021-02-05T07:17:23+5:30
कोल्हापूर : शहराच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली असून, त्यासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ...
कोल्हापूर : शहराच्या विकासाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली असून, त्यासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा संपर्क मंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि.१५) रात्री येथे बोलताना दिली.
शिवसेनेच्या वतीने सोमवारी जुना बुधवार पेठ व शनिवार पेठेतील सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर होते. माजी महापौर सरिता मोरे व स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी कोल्हापूरच्या विकासाबाबत बैठक घेतली. त्यामध्ये कशा पद्धतीने शहराचा विकास करायचा हे ठरले आहे. त्याची घोषणा ते स्वत:च करणार आहेत. भविष्यकाळात शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही. शिवसेनेत जे येतील त्यांना पश्चाताप होणार नाही. शहरातील वातावरण आता बदलले असल्याने शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकेल.
आमदार असूनही जमले नाही
दहा वर्षे आमदार असूनही मी राहत असलेल्या भागात नगरसेवक निवडून आणता आला नाही, अशी कबुली देत क्षीरसागर यांनी, नंदकुमार मोरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे परिसरातील पाच ते सहा नगरसेवक निवडून आणू शकतो असे सांगितले.
-२५ कोटींचा निधी मिळणार -
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिन्यात पंधरा कोटींचा निधी दिला. येत्या दोन दिवसात आणखी २५ कोटींचा निधी शहरातील विकासकामांना दिला जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.