शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:53 PM2022-05-23T19:53:53+5:302022-05-23T19:54:38+5:30
आम्ही कधीही संभाजीराजे यांना आमचा प्रचार करा असे म्हटले नाही. ते कधीही, कुठल्याही भाजपच्या व्यासपीठावर नव्हते.
कोल्हापूर : भाजपने संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. आता शिवसेनेने संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राजांना भाजपच्या कार्यालयात बोलावणार आहात का?
पाटील म्हणाले, ज्या वेळी संभाजीराजेंना राज्यसभा देण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रातील तीन जागांमधून एक जागा देण्याचे नियोजन होते. परंतू हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले तेव्हा त्यांनी ‘राजांना तुम्ही भाजपच्या कार्यालयात एबी फॉर्मवर सह्या करण्यासाठी बोलावणार आहात का’ असा आम्हांला प्रश्न विचारला. त्यांना आपण सन्मानपूर्वक राष्ट्रपती कोट्यातून खासदार करू असा शब्द त्यांनी दिला. त्यानुसार त्यांनी सहा वर्षे काम केले. आता शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा.
तर दिल्लीशी बोलून घेवू
तिसऱ्या उमेदवारासंदर्भात भाजपचा कोणताही निर्णय झालेला नाही. संभाजीराजेंनी भाजपकडून उमेदवारीच मागितलेली नसल्याने याबाबत प्रश्नच येत नाही. परंतू अगदीच त्यांनी मागणी केली तर हा निर्णय दिल्लीत होणार असल्याने मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून घेवू.
संभाजीराजेंचा पक्षासाठी वापर केला नाही
तुम्ही कधीही संभाजीराजेंनी भाजप की जय म्हणताना पाहिले आहे का अशी पत्रकारांनाच विचारणा करून पाटील म्हणाले, आम्ही कधीही संभाजीराजे यांना आमचा प्रचार करा असे म्हटले नाही. ते कधीही, कुठल्याही भाजपच्या व्यासपीठावर नव्हते. त्यामुळे जरी त्यांना सन्मानपूर्वक राज्यसभेची खासदारकी दिली असली तरी ती शाहू महाराजांच्या राजघराण्याचा सन्मान म्हणून दिली होती. त्यामुळे त्यांचा पक्षीय राजकारणासाठी वापर करून घेतला नाही