दडपशाही कोल्हापुरातच का?-- शिवसेना : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:00 AM2017-08-31T01:00:30+5:302017-08-31T01:00:36+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्ये डॉल्बीसंदर्भात मवाळ भूमिका घेणाºया विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातच का दडपशाही सुरू केली आहे?

 Shiv Sena: Stalking Front of Special Inspector General of Police | दडपशाही कोल्हापुरातच का?-- शिवसेना : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा

दडपशाही कोल्हापुरातच का?-- शिवसेना : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्ये डॉल्बीसंदर्भात मवाळ भूमिका घेणाºया विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातच का दडपशाही सुरू केली आहे? असा सवाल करून शिवसेनेने बुधवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला; परंतु पोलिसांनी निम्म्या मार्गावरच हा मोर्चा रोखला. त्यामुळे या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांसह नांगरे-पाटील यांचा निषेध केला. कायद्याच्या अधीन राहून डॉल्बीला परवानगी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास पितळी गणपती चौकात शिवसैनिक जमले. येथे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली पाच आरत्या करून मोर्चाला सुरुवात झाली. पोलिसांची दडपशाही खपवून घेणार नाही... अवैध व्यवसायांना आळा घाला अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गोकुळ दूध संघाच्या कार्यालयासमोर पोलिसांनी लोखंडी अडथळे उभारून मार्ग बंद केला होता. तिथे पोलिसांनी मोर्चा रोखला. निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यास स्पष्ट नकार देत आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो असून, निवेदन देण्याचा प्रश्नच नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

विजय देवणे म्हणाले, ‘ कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना पोलिसांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही; परंतु सणांवेळी मात्र यांची दडपशाही सुरू आहे. ती खपवून घेणार नाही.’ संजय पवार म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे.’आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, दत्ताजी टिपुगडे, राजू जाधव, अवधूत साळोखे, बाजीराव पाटील, शुभांगी पोवार, संभाजी भोकरे, राजू यादव, हर्षल सुर्वे, रणजित आयरेकर, विराज पाटील, आदी सहभागी झाले होते.

कायदा मोडणाºयांची गय करणार नाही : नांगरे-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच डॉल्बीविरहित गणेश विसर्जन मिरवणुकीची भूमिका घेऊन आम्ही काम करीत आहोत. मिरवणूक ही पारंपरिक तसेच स्टेरिओसारख्या वाद्यांच्या गजरात झाली तर तिला आमची काहीच हरकत नाही. विनाकारण तरुणांवर गुन्हे दाखल करणे ही मुळी आमची भूमिकाच नाही. त्यामुळे जर कोणी डॉल्बी लावून कायदाच मोडणार असेल, तर त्याची मात्र गय केली जाणार नाही, असा इशारा बुधवारी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
डॉल्बीच्या आवाजामुळे महाद्वार रोडवर गॅलरी कोसळून दुर्घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यात आली असून, यावेळी जर डॉल्बीमुळे असा प्रकार घडून कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नांगरे-पाटील म्हणाले, आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज बंद करण्यात शंभर टक्के यश आले. आता विसर्जन मिरवणुकीतही डॉल्बीमुक्तीचा निर्धार केला आहे. डॉल्बीच्या भिंती उभ्या राहू नयेत यासाठी महाद्वार रोडवर तपासणी केली जाणार आहे. पोलिसांची नजर चुकवून ऐनवेळी डॉल्बी लावल्यास मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार कारवाई करून डॉल्बी सिस्टीम तातडीने जप्त केली जाणार आहे.

हट्ट सोडा; अन्यथा कठोर कारवाई : चंद्रकांतदादा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डॉल्बी चालक-मालकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाची भूमिका संवेदनशील आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. त्यासाठी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा हट्ट धरू नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
निवासस्थानी झालेल्या भेटीत डॉल्बीमालकांनी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, मंत्री पाटील यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. कायद्यामुळे डॉल्बी लावताच येणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन सिस्टीम लावल्यास अडचण येणार नाही. मात्र, त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा पाटील यांनी दिला. व्यावसायिकांचे जे काही आर्थिक नुकसान होईल त्याची सर्व भरपाई आम्ही करू, असेही आश्वासन पालकमंत्र्यांनी डॉल्बीमालकांना दिले.

क्षीरसागर आज पोलीस अधीक्षकांना भेटणार
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या करा, अशी मी कधीही मागणी केलेली नाही, न्यायालयाच्या निर्णयाच्या चौकटीत राहून दोन बेस आणि दोन टॉप साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे, त्यासाठी आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेणार आहे. पोलीस प्रशासनाने रीतसर परवानगी न दिल्यास न्यायालयाचा आदेश मानून आम्ही दोन बेस आणि दोन टॉप अशी साऊंड सिस्टीम लावणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेश आगमनावेळी कºहाड, सातारा, सांगली येथे २ बेस आणि २ टॉप सुरू होते. मग त्या नियमाबाबत कोल्हापूरवरच अन्याय का? असाही प्रश्न आमदार क्षीरसागर यांनी विचारला. कोल्हापूरकर कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.

डॉल्बीबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे नियम सगळ्या महाराष्ट्राला लागू आहेत; पण ते एकट्या कोल्हापूरलाच लागू करण्याचा पोलीस प्रशासनाचा आग्रह चुकीचा आहे. या वादात दोन्ही बाजंूकडून समन्वयाने मार्ग निघावा व मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
- सतेज पाटील, आमदार

Web Title:  Shiv Sena: Stalking Front of Special Inspector General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.