शिवसेना भाजपला ‘टाळी’ देण्याची शक्यता धूसर
By admin | Published: March 4, 2017 12:56 AM2017-03-04T00:56:00+5:302017-03-04T00:56:00+5:30
जिल्हा परिषद सत्ताकारण : जिल्हाप्रमुखांचा अहवाल सादर
कोल्हापूर : ज्या पद्धतीने भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय आक्रमकपणे अन्य पक्षांतील मान्यवरांना घेत काँग्रेसच्या बरोबरीने जागा मिळविल्या ते पाहता शिवसेना जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये भाजपला ‘टाळी’ देण्याची शक्यता धूसर झाल्याचे मानले जाते. गुरुवारच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळचेही एकूण वातावरण आणि अहवालाचा सारांश भाजपविरोधीच असल्याचे समजते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी १४ जागा मिळवून अग्रभागी आहेत, तर ११ जागा मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या व १० जागा मिळवत शिवसेना तिसऱ्या स्थानावर आहे. तिघांपेक्षा जागा कमी असल्या तरी शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कुणाचीच सत्ता जिल्हा परिषदेत येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मुंबई महापालिकेतील सत्तेचा तिढा सुटत नसल्याने कोल्हापूरला निर्णय लांबणीवर पडला आहे.
उद्धव ठाकरे यांनीही गुरुवारी कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्टपणे सांगितले आहे.
मात्र, एकूणच ठाकरे यांची देहबोली आणि जिल्ह्यातील राजकीय हालचाली पाहता ठाकरे यांच्याकडे दिलेल्या अहवालाचा सारांश भाजपविरोधीच असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपला
प्राधान्य देण्यापेक्षा अन्य पर्याय शोधण्याच्या तयारीत असल्याचे वातावरण आहे.
शिरोळमधील दाखला
शिरोळमध्ये ज्या बहुजन विकास आघाडीमुळे शिवसेनेचे उल्हास पाटील हे आमदार बनले. किंबहुना याच आघाडीने पाटील यांना ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडायला लावून आमदार केले हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही सगळी आघाडीच भाजपमध्ये घेऊन शिरोळमध्ये ‘स्वाभिमानी’सोबतच शिवसेनेसमोरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले आहे. याच पद्धतीने भाजप शिवसेनेला जाईल तेथे कोंडीत पकडणार असेल तर मग जिल्हा परिषदेत एकत्र यायचे तरी कशाला, अशी शिवसैनिकांची मानसिकता आहे.
शिवसेना गावागावांत
शिवसेना गेली अनेक वर्षे गावागावांत सक्रिय असताना, आंदोलने करत असताना दुसरीकडे भाजप मात्र आयात पुढाऱ्यांच्या जीवावर लढाया लढत आहे. ज्यांची संघटना गावापर्यंत नाही असा भाजप जर आम्हाला दामटण्याचे काम करत असेल तर ते का खपवून घ्यायचे, अशी विचारणा होत आहे.