Kdcc Bank Election : आघाडीत बिघाडी, शिवसेना स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 04:36 PM2021-12-21T16:36:43+5:302021-12-21T16:37:09+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. सत्तारुढ आघाडीतून अखेर शिवसेना बाहेर पडल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दुपारी शिवसेनेचे पॅनेल देखील जाहीर केले. शिवसेनेने तीन जागाची मागणी केली होती. मात्र सत्तारुढ आघाडीने शिवसेनेची ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे अखेर या आघाडीत बिघाडी झाली.
दरम्यान, निवडणुकी आधीच मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :
गट प्रक्रियेतून - संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील
नागरी बँक आणि पतसंस्था गटातून - आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जून अबिटकर
महिला गटातून : लतिका पाटील आणि रेखा कुऱ्हाडे
अनुसुचित जाती जमाती गटातून : उत्तम कांबळे
विमुक्त जाती जमाती : विश्वास जाधव
इतर मागासवर्गीय गटातून : रविंद्र बाजीराव मडके
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी ५ जानेवारीला मतदान होणार आहे. अर्ज माघारीला शेवटचा दिवस बाकी असताना शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. मात्र यावर तोडगा निघाला नाही. सत्तारुढ आघाडीतून शिवसेनेला प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक आणि महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने या दोन जागा देऊ केल्या होत्या.