शिरोळ तहसीलवर शिवसेनेचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:51+5:302021-02-06T04:43:51+5:30

शिरोळ : सतत वाढत चाललेल्या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभेच्या ...

Shiv Sena's attack on Shirol tehsil | शिरोळ तहसीलवर शिवसेनेचा हल्लाबोल

शिरोळ तहसीलवर शिवसेनेचा हल्लाबोल

Next

शिरोळ : सतत वाढत चाललेल्या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महागाई कमी करू, असा देशवासीयांना दिलेला शब्द भाजप सरकारने बासनात गुंडाळल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव ऊगळे यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत आंदोलनकर्ते तहसीलच्या प्रवेशव्दारासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात २१ वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. आधीच वाढलेल्या महागाईला तोंड देताना जनता मेटाकुटीला आली असताना, भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने वाढ करून आणखीन महागाईच्या खाईत लोटले आहे.

कोविडसारख्या महामारीने कहर केला असताना, तेलाचे दर वाढवून त्यापेक्षाही मोठा कहर केंद्राने केला आहे. त्यामुळे दर नियंत्रणात आणावेत, अशा मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना यावेळी देण्यात आले.

आंदोलनात नगरसेवक पराग पाटील, मधुकर पाटील, मंगल चव्हाण, राहुल काकडे, विकास सुतार, राजू पाटील, प्रतीक धनवडे, युवराज घोरपडे, रेखा जाधव, राजू कदम, सतीश चव्हाण, मनीषा पवार, अर्चना भोजणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो - ०५०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ तहसील कार्यालयावर शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Shiv Sena's attack on Shirol tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.