पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:38 AM2018-01-30T04:38:25+5:302018-01-30T04:38:36+5:30
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच राज्य शासन पेट्रोलवर आकारत असलेल्या कराचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. राज्यात पेट्रोल प्रतिलीटर ८० रुपयांच्या घरात गेले आहे. याबाबींचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने या मोर्चाचे आयोजन केले होते.
मोर्चात शिवसैनिक बैलगाड्यातून सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली, ‘सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणाºया शासनाचा धिक्कार असो’, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी झालेल्या सभेत आमदार क्षीरसागर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला गाजर दाखविले तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनतेला गाजर दाखवत आहेत, असे क्षीरसागर म्हणाले.