शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

By Admin | Published: January 31, 2017 11:44 PM2017-01-31T23:44:53+5:302017-01-31T23:44:53+5:30

युती महापालिकेपुरती तुटली; सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेसशी आघाडी करणार

Shiv Sena's life is in power: Rane | शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

शिवसेनेचा जीव सत्तेतच : राणे

googlenewsNext

सावंतवाडी : शिवसेना-भाजप युती महानगरपालिकेपुरती तुटली आहे. शिवसेनेचा सत्तेत जीव अडकल्याने ते सरकारमधून बाहेर पडू शकणार नाहीत आणि पडलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था भाजपने करून ठेवली आहे, अशी टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, तशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी सावंतवाडी तालुक्यात येऊन आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, माजी सभापती प्रियांका गावडे, आनंदी परब, प्रमोद गावडे, नगरसेवक राजू बेग, आदी उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, शिवसेना आणि भाजपने यापूर्वीही अनेक निवडणुका वेगवेगळ्या लढल्या आहेत आणि त्यानंतर ते एकत्र आले आहेत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचेही उदाहरण सर्वांसमोर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना युती नकोच होती, फक्त केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी सर्व नाटके केली.
जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे. याबाबत माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अद्याप भेटले नाहीत. त्यामुळे अजून चर्चा झाली नाही. काँग्रेसकडे विद्यमान ४२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत बोलणी करीत असताना सर्व बाजू विचारात घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल.
जी विकासकामे केली, निधी आणला म्हणून सांगतात, त्यांनी निधी कसा आणला, कोणत्या योजनेवर खर्च केला याचा तपशील द्यावा. याबाबतची मागणी मी स्वत: जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून, याचे उत्तर अद्याप मिळाले नाही आणि अलीकडे जी उद्घाटने झाली, ती काँग्रेसच्या काळातील निधीतून करण्यात आली, अशी टीकाही राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता केली आहे. (प्रतिनिधी)

निवडणुका आल्या की भाजपला ‘ईडी’ची आठवण येते
प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की, नारायण राणे यांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. भाजपला मला अधिवेशन व निवडणुकांपासून रोखायचे असते, पण मी गप्प बसणारा नाही. माझे काम करीतच राहणार आहे. राज्यात सर्वत्र प्रचारासाठी जाणार असल्याचे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.



दोन दिवसांत उमेदवारांची यादी
सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ उमेदवार इच्छुक आहेत. ही वस्तुस्थिती आहे, पण यामुळे बंडखोरी होईल, असे वाटत नाही. बंडखोरी होईल या भीतीने आम्ही उमेदवार घोषित केले नाहीत, ही अफवा चुकीची आहे. काँग्रेस दोन दिवसांत उमेदवारांची यादी घोषित करणार आहे. मी प्रचारदौऱ्यात असल्याने यादी जाहीर करण्यास उशीर झाल्याचे राणे यांनी सांगितले.
महाआघाडी होऊनही
जिल्हा परिषद जिंकली
शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा काँग्रेसला घेण्याची गरज नाही. कारण मागच्या निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात सर्व पक्षांची महाआघाडी होती. तरीही जनता काँग्रेसच्याच मागे राहते. त्यामुळे यावेळी युती तुटली तरी काही फरक पडणार नाही. सत्ता आमचीच येणार, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Shiv Sena's life is in power: Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.