आजऱ्यातील नादुरुस्त सीसीटीव्हीच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:26+5:302021-08-24T04:27:26+5:30
शिवसेनेने आजरा शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करावेत यासह अन्य मागण्यांसंदर्भात १० दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, याबाबत ...
शिवसेनेने आजरा शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करावेत यासह अन्य मागण्यांसंदर्भात १० दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नगरपंचायतीच्या दारात आल्यानंतर शिवसैनिकांनी शंखध्वनी करून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहरप्रमुख ओंकार माद्याळकर यांनी नगरपंचायतीच्या प्रशासनासमोर प्रश्नांचा भडिमार केला. नगरपंचायत हद्दीतील वाहतूक नियंत्रण, मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार, पाण्याचे नियोजन योग्य नसल्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही, शहरातील स्वच्छता असे प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला भंडावून सोडले. शहरातील सीसीटीव्ही नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून बसविण्यात आले होते. ते सुरू करण्याबाबत पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांची मंगळवारी (२४) सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यामध्ये बैठक आयोजित केली आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना ही जुनी झाल्याने नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मोकाट जनावरांच्या मालकांना यापूर्वी वारंवार सूचना दिल्या असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्वच्छतेसाठी घंटागाडी फिरवली जात असून कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात आहे. डेंग्यू प्रतिबंध कालावधीमध्ये शहरात औषध फवारणी केली आहे.
मोर्चात युवराज पोवार, ओंकार माद्याळकर, महेश पाटील, गणपती मिसाळ, रवींद्र पाटील, अमानुल्ला आगलावे, आनपाल तकीलदार, समीर चाॅंद, दिनेश कांबळे, गुडू खेडेकर यांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.
... विना मास्कचे गोळा केलेले दंडाचे पैसे गेले कुठे..?
लाॅकडाऊनच्या काळात विना मास फिरणाऱ्यांकडून जवळपास पाच लाख रुपये जमा केले आहेत. ते पैसे गेले कुठे ? कशासाठी खर्च केले ? असा सवाल युवराज पोवार यांनी केला. दंडाच्या पैशांमधून गोळ्या वाटल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर शिवसैनिकांनी जोरदार आक्षेप घेत नगरपंचायतीचा निषेध केला.
फोटोकॅप्शन - आजरा नगरपंचायतीसमोर सीसीटीव्हीच्या प्रश्नासंदर्भात शंखध्वनी आंदोलन करणारे शिवसैनिक.
फाेटो क्रमांक : २३०८२०२१-गड-०१