शिवसेनेचे मुरलीधर जाधव ‘गोकुळ’मध्ये घुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:39+5:302021-08-28T04:27:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ‘गोकुळ’च्या कामकाजात सहभागी करून घेत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ...

Shiv Sena's Murlidhar Jadhav entered 'Gokul' | शिवसेनेचे मुरलीधर जाधव ‘गोकुळ’मध्ये घुसले

शिवसेनेचे मुरलीधर जाधव ‘गोकुळ’मध्ये घुसले

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ‘गोकुळ’च्या कामकाजात सहभागी करून घेत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी शुक्रवारी संघाच्या दूध प्रकल्प येथील कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत घोषणाबाजी व शंखध्वनी केल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. तब्बल तासभर जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी संचालक मंडळ सभागृहात ठिय्या मारला. अखेर साेमवारी (दि. ३०) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक उठले.

मुरलीधर जाधव यांची ६ जुलैरोजी शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून दुग्ध विभागाने नियुक्ती केली. मात्र त्यांना स्वीकारण्यास ‘गोकुळ’च्या नेत्यांनी विरोध केल्याने जाधव हे शुक्रवारी दुपारी शिवसैनिकांसह संघाच्या कार्यालयात गेले. प्रवेशव्दारापासूनच त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत थेट संचालक मंडळ सभागृहात घुसले. बोर्ड सचिव एस. एम. पाटील व प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांना बोलवा, अशी मागणी जाधव यांनी केली. तोपर्यंत जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाची पायमल्ली करत असाल, तर खपवून घेणार नाही. नियुक्तीला कोणत्या मंत्र्याचा विरोध आहे, मुख्यमंत्र्यांपेक्षा स्वत:ला मोठे समजू नका, हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. केंद्रीय मंत्र्याला गुडघे टेकायला लावले, तिथे तुम्ही कोण?

संचालक मंडळाची बैठक सोमवारी आहे. आयत्यावेळच्या विषयात हा विषय ठेवतो, असे लेखी आश्वासन डी. व्ही. घाणेकर यांनी दिल्यानंतर जाधव यांनी सभागृह सोडले. यावेळी रवींद्र माने, मधुकर पाटील, महादेव गौड आदी उपस्थित होते.

हिंदुत्ववाद्यांचे दूध चालते, मग ते का नको!

पद नसले तरी चालेल; मात्र मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही. हिंमत असेल तर शिवसेनेशी दोन हात करा. हिंदुत्ववादी चालत नाहीत; मग हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात कसे राहता? उदयापासून जिल्ह्यातून दुधाची वाहतूक कशी होते, तेच बघतो, असा इशारा जाधव यांनी दिला.

आत येतो, मग सगळ्यांची भंबेरी उडवतो..

प्रकाश पाटील हे एकमेव संचालक चर्चेवेळी उपस्थित होते, मुरलीधर जाधव हे आपले पाहुणे असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाहुणे होता, तर मागील मिटिंगला हा विषय का मांडला नाही? मी आत येतो, मग सगळ्यांची भंबेरी उडवतो, असा इशारा जाधव यांनी दिला.

तर ७ सप्टेंबरला ‘गोकुळ’ ठेवणार नाही

सोमवारच्या बैठकीला मान्यता देऊन रितसर कार्यवाही केली नाही तर ७ सप्टेंबरला जिल्ह्यातील चिलिंग सेंटर बंद पाडणारच त्याशिवाय दुधाची एक गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही. ‘गोकुळ’ जाग्यावर ठेवणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

Web Title: Shiv Sena's Murlidhar Jadhav entered 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.