शिवसेनेतील फाटाफूट कुणाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:01+5:302021-03-13T04:44:01+5:30

नसिम सनदी, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गतवेळी विजयाचा घास अवघ्या ५६६ मतांनी हुकल्याने, यावेळी भाजपने नागाळा पार्क प्रभागात ...

Shiv Sena's rift on someone's path | शिवसेनेतील फाटाफूट कुणाच्या पथ्यावर

शिवसेनेतील फाटाफूट कुणाच्या पथ्यावर

Next

नसिम सनदी,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गतवेळी विजयाचा घास अवघ्या ५६६ मतांनी हुकल्याने, यावेळी भाजपने नागाळा पार्क प्रभागात जोरदार फिल्डिंग लावली असून गटांतर्गत फोडाफोडीवर भर दिला आहे. शिवसेनेमुळे विजय हुकल्याने त्यांच्यातच फाटाफूट करून काँग्रेसचे नगरसेवक अर्जुन आनंद माने यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, पण माने यांनी पाच वर्षात केलेली विकासकामे, खेचून आणलेला कोट्यवधीचा निधी आणि मदतीला धावून जाण्याची प्रवृत्ती या जमेच्या बाजू असल्याने राजकीय आव्हान क्षुल्लक ठरत असल्याचे प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

बहुतांशी उच्चवर्गीय सुशिक्षित मतदार असलेला नागाळा पार्क (क्रमांक १२) हा प्रभाग जिल्हा परिषद, नागाळा पार्क कमान, केव्हीज पार्क, विशाळगड कंपौंड, नागोबा मंदिर, विवेकानंद कॉलेज परिसर, एस.टी, वारणा कॉलनी, महाराष्ट्र मार्केट, एमएसइबी कॉलनी, लकी नरेश बंगला, पीडब्ल्यूडी कॉलनी, पितळी गणपती असा विस्तारलेला आहे. उच्चभ्रू आणि कामगार कॉलन्यांचा हा प्रभाग तसा निवांत आणि राजकीयदृष्ट्या तसा असंवेदनशील. पण गेल्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा संघर्ष झाला. दिवंगत माजी खासदार शंकरराव माने यांचा नातू व चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांचा मुलगा अर्जुन माने यांनी पहिल्याच प्रयत्नात भाजपला धूळ चारत काँग्रेसचा गड कायम राखला. पहिल्यांदाच नगरसेवक आणि त्यापाठाेपाठ उपमहापौर पदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करत कोट्यवधीचा निधी खेचून आणत वर्षानुवर्षे रखडलेल्या विकास कामांना गती दिली. रस्ते, ड्रेनेजची कामे प्राधान्याने हाती घेत ती पूर्ण देखील केल्याने आज प्रभागात फिरताना चकाचक आणि प्रशस्त रस्ते दृष्टीस पडतात. कचरा उठावाची कुणकुण अधे-मध्ये कानावर येते, पण एकूणच कामावर समाधानी असल्याचे चित्र आहे. स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा, आजी शहर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, वडीलही स्वीकृत नगरसेवक, आई अनुराधा माने उद्योजिका... असा समाजसेवेशी जोडलेला वारसा असल्याने त्याचाही लाभ अर्जुन माने यांना होत आहे. ते स्वत: राष्ट्रीय जलतरणपटू असून महापुराच्या काळात प्रभागातील लोकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी ते तीन-चार दिवस पुरात उतरले होते.

विकास कामांचा विषय बऱ्यापैकी संपल्याने आता मात्र येथे राजकीय कुरघोड्यांना ऊत आल्याचे दिसत आहे. विशेषत: शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ आहे. गेल्यावेळी शिवसेना व भाजप स्वतंत्र लढली. भाजप दुसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या उमेदवारांनी अनुक्रमे ८१९ आणि ५२५ मते घेतली. याची बेरीज केली, तर विजयी उमेदवारापेक्षा फक्त ४१ मतांची पिछाडी राहत होती. याची सल कायम राहिली तरी, राजकारणात कधी असे दोन अधिक दोन म्हणजे चार असे उत्तर नसते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या गटात येथील शिवसेना विभागली आहे. त्याचा फटका मागील निवडणुकीत बसला, आताही तीच परिस्थिती असून क्षीरसागर गटाचे संदीप भोसले यांनी शिवसेना बायबाय... करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

प्रभागाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याने नगरसेवक माने यांचा पत्ता कट झाला असला तरी, त्यांनी पत्नी अर्पिता यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेतील फुटीमुळे पवार गटाचे नरेश तुळशीकर यांनी पत्नी शारदा यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेकडून भाजपमध्ये जात असलेले संदीप भोसले यांनी पत्नी नम्रता यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्याचवेळी भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या विश्वासावर किशोर लाड यांनी पत्नी कविता यांच्यासाठी तयारी सुरू केली आहे.

विद्यमान नगरसेवक : अर्जुन आनंद माने

आताचे एकूण मतदार : ६ हजार ९०७

आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला

गतवेळच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

अर्जुन माने (काँग्रेस) - १३८५

अशोक कोळवणकर (भाजप) : ८१९

नरेश तुळशीकर (शिवसेना) : ५२५

राजेश करंदीकर (राष्ट्रवादी) : ३३५

शिल्लक असलेली कामे...

केव्हीज पार्कसह जिल्हा परिषद परिसरात कचरा उठाव वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी

प्रभागात सार्वजनिक शौचालये नसल्याने फिरायला जाणाऱ्यांची कुचंबणा

ज्येष्ठ, लहानांसाठी मोठे प्रशस्त असे उद्यान नाही

विजयादेवी घाटगे विद्यालयाच्या मागील रस्त्याचे काम नाही

प्रभागात झालेली कामे...

पाच वर्षात पाच कोटींचा निधी आणला

नागोबा मंदिरजवळचे वर्षानुवर्षे रखडलेले ड्रेनेजचे काम पूर्ण

जिल्हा परिषदेसह सर्व प्रमुख मार्गावर दर्जेदार पध्दतीने डांबरी रस्ते

मेरी वेदर ग्राउंडवर ओपन जिम, स्ट्रीट लाईट

नागाळा पार्क कमानीचे सुशोभिकरण

महाराष्ट्र उद्यानाच्या कामासाठी २० लाखाचा निधी मंजूर

प्रतिक्रिया

वर्षानुवर्षे रखडलेली कामे प्राधान्याने हाती घेत ती पाच वर्षात पूर्ण केली याचे समाधान आहे. नागरिकांच्या संपर्कात सदैव आहे. वारणा कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची कामे केली. पण ही सरकारी कॉलनी असल्याने नगरसेवकांचा निधी खर्च करता येत नसल्याची अडचण असल्याने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे विनंती केली होती, पण त्यांनी नाकारली. त्यामुळे आता आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून निधी आणून काम करण्यास प्राधान्य आहे.

- अर्जुन माने,

विद्यमान नगरसेवक

Web Title: Shiv Sena's rift on someone's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.