शाहूवाडी तालुक्यात शिवसेनेचाच भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:41+5:302021-01-19T04:25:41+5:30
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने तेरा ठिकाणी बाजी मारत भगवा फडकविला आहे. ...
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने तेरा ठिकाणी बाजी मारत भगवा फडकविला आहे. तर जनसुराज्य पक्षाने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. सर्व गटाच्या स्थानिक आघाड्यांनी अकरा ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींमध्ये सत्तांत्तर झाले तर सोळा ग्रामपंचायतींवर सत्ता कायम राहिली.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू होते. पेरीड ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले नाही. मतमोजणीत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील गटाने तेरा ग्रामपंचायतींवर बाजी मारली तर जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या गटाने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. अकरा ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी सत्ता काबीज केली. यामध्ये शिवसेना, जनसुराज्य , काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आघाड्यात सामील आहेत. शित्तुर वारुण, शिंपे, नेर्ले, शिरगाव, बुरंबाळ , मांजरे , आंबा परळेनिनाई या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. तर गजापूर - विशाळगड, केर्ले - हुबवली, मानोली, पेडांगळे, सोते, नांदगाव गोंडोली, परळे, नांदारी, नांदगाव या ग्रामपंचायतींवर सत्ता कायम राहिली.
आंबा, कांडवण, सावर्डे बुद्रुक या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना समान मते पडली. यामध्ये नितीन कांबळे (९३), राजेश चव्हाण ( १०३ ), विजय पाटील ( २०२ ) हे तीन उमेदवार चिठ्ठीवर विजयी घोषित करण्यात आले. सेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील यांनी पेंडागळे ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखली. तर जनसुराज्य पक्षाचे माजी सरपंच रंगराव खोपडे यांनी सेनेचा पराभव करून मोळावडे ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राखली. शिंपे ग्रामपंचायतीवर गायकवाड गटाची सत्ता होती. पंधरा वर्षांनंतर सेनेने येथे आपली सत्ता स्थापन केली आहे. माजी पंचायत समिती उपसभापती विष्णू पाटील यांनी सोनवडे ग्रामपंचायतीवर सत्ता राखली.
फोटो १८ शाहूवाडी-
मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेनेच्या कार्यकत्यांनी जल्लोष केला.