महापालिका बरखास्तीसाठी शिवसेनेची जोरदार निदर्शने
By admin | Published: February 1, 2015 01:17 AM2015-02-01T01:17:18+5:302015-02-01T01:30:26+5:30
अतिरिक्त आयुक्तांना निवेदन : राजीनाम्याची मागणी
कोल्हापूर : घोटाळे, भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा उद्रेक झालेली कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी आज, शनिवारी सकाळी शिवसेनेच्यावतीने महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. निदर्शनांनंतर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शिवसैनिकांसमोर जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले.
सकाळी साडेअकरा वाजता सुमारे दोनशेहून अधिक शिवसैनिक शनिवार पेठेतील ‘शिवालय’ येथून मोर्चाने महानगरपालिकेसमोर गेले. मुख्य दरवाजावर त्यांना रोखण्यात आले. नंतर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. ‘महापालिक ा बरखास्त करा, लाचखाऊ महापौरांवर कारवाई करा,’ अशा मागण्या घोषणांद्वारे देण्यात येत होत्या.
पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी मोर्चासमोर जाऊन निवेदन स्वीकारले. महापौर तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले, ही कोल्हापूरच्या स्वाभिमानास तडा देणारी घटना आहे. गेल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते यांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी मॅच बेटिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यामुळे महानगरपालिकेस लागलेली ही कीड नष्ट करून स्वच्छ प्रशासन देण्याकरिता तातडीने महापौर व विरोधी पक्षनेते यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शिवाजीराव जाधव, विजय कुलकर्णी, अमर क्षीरसागर, राहुल बंदोडे, धनाजी दळवी, जयवंत हारुगले, पद्माकर कापसे, आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. (प्रतिनिधी)