शिव-बसव प्रतिमेची मिरवणूक
By Admin | Published: April 22, 2015 12:36 AM2015-04-22T00:36:36+5:302015-04-22T00:53:27+5:30
बसवेश्वर महाराजांची जयंती : जिल्ह्यात मोटारसायकल रॅली, जन्मकाळ, पालखी मिरवणुका, आदी कार्यक्रम
कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी लिंगायत समाजाच्यावतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून धार्मिक व उत्साही वातावरणात जगद्गुरू बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी झाली. गडहिंग्लज येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर यांची जयंती संयुक्तपणे साजरी झाली. जिल्ह्यात ज्योत, मोटारसायकल रॅली, जन्मकाळ व पालखी मिरवणूक, असे विविध कार्यक्रम उत्साहात झाले.
गडहिंग्लज परिसर
गडहिंग्लज : महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज तालुका लिंगायत धर्मसभा व येथील वीरशैव समाज सेवा मंडळातर्फे बसवेश्वरांची प्रतिमा व शिवपुतळ्याची सायंकाळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे व उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. बसवेश्वर चौकात राष्ट्रीय बसव दलाच्या युवक कार्यकर्त्यांनी कुडलसंगमहून आणलेल्या बसवज्योतीचे स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीत वीरशैव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, छ. शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील, अरविंद कित्तूरकर, अॅड. रवी तोडकर, डॉ. बी. एस. पाटील, बाळासाहेब गुरव, प्रा. शिवाजीराव भुकेले, महादेव मुसळे, सचिन हिरेमठ, काशिनाथ घुगरी, राहुल पाटील, बाळासाहेब घुगरे, राजेंद्र तारळे, राजेश पाटील, जितेंद्र पाटील, शारदा आजरी, समाजबांधव सहभागी झाले होते.
गडहिंग्लज तालुका
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात म. बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली.
नगरपालिकेत नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, मुख्याधिकारी तानाजी नरळे, आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामस्थांतर्फे महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून शिव-बसव प्रतिमांची प्राथमिक शाळेच्या झांज व लेझीम पथक, बैलगाड्यांतून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत बापूसाहेब पाटील, राजशेखर पाटील, विजय भुरगुडा, रायगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, निगोंडा पाटील, सहदेव घुगरे, संजय जोशीलकर, महादेव घुगरे, तम्माण्णा भुरगुडा, सुभाष पाटील, सुरेश घुगरे, बाबू कुरळे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. विठ्ठल पाटील यांच्या हस्ते कन्नड नाटकाचे उद्घाटन झाले.
चंदुरात बसवेश्वर जयंती
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील लिंगायत समाजाच्यावतीने बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून धार्मिक व उत्साही वातावरणात जगद्गुरू बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
आळते (ता. हातकणंगले) येथील अल्लमप्रभू डोंगरावरील अल्लमप्रभू मंदिरातून ज्योत आणण्यात आली. आभार फाटा येथे बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील प्रमुख ज्योत फिरवून महादेव मंदिर येथे ठेवण्यात आली. पहाटे शिवलिंगाला अभिषेक घालून दुपारी बारा वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ, पाळणा, आरती व पूजन करण्यात आले. सायंकाळी गावातील प्रमुख मार्गांवरून ‘श्रीं’ची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. लिंगायत समाजाचे अध्यक्ष दशरथ मलकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले.
तारदाळ परिसर
तारदाळ : तारदाळ येथे शिव-बसव जयंती साजरी झाली. सरपंच शाराबाई काबंळे, शोभा माळी, सुकुमार कोळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.