साध्या कौलापासून तयार केली शिवकालीन नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:02+5:302021-04-01T04:25:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : ग्रामीण विद्यापीठ म्हणून सर्वपरिचित असलेल्या श्री. मौनी विद्यापीठ संचलित श्री. उदाजीराव अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : ग्रामीण विद्यापीठ म्हणून सर्वपरिचित असलेल्या श्री. मौनी विद्यापीठ संचलित श्री. उदाजीराव अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला अध्यापनशास्त्र या विषयांतर्गत उठाव शिल्प म्हणून साध्या कौलापासून शिवकालीन नाणी तयार केली आहेत. येथील उपक्रमशील कलाशिक्षक प्रा. सुधीर गुरव यांच्या कल्पकतेतून या नाण्यांची निर्मिती झाली असून, शिवकालीन इतिहासाच्या अध्यापनासाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे.
अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राथमिक शाळेत सराव पाठासाठी जात असतात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहास विषय शिकवताना शैक्षणिक साधन म्हणून या नाण्यांचा उपयोग करता येऊ शकतो. शालेय विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष नाणी हाताळण्याचा आंनद घेता यावा, या उद्देशाने नाण्यांची निर्मिती केली असल्याचे प्रा. सुधीर गुरव यांनी सांगितले.
विशेषतः कोरोना काळात सर्वत्र विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रा. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उठाव शिल्पाचे हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिवकालीन मुद्रा असलेली २१ नाणी तयार केली आहेत. प्रा. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उठाव शिल्पाचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी त्यांना श्री. मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मंत्री सतेज पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष कोरगावकर, संचालक डॉ. आर. डी. बेलेकर. प्राचार्य व्ही. एस्. पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
फोटो ओळ
अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवकालीन नाणी तयार केली आहेत.