शिवाजी पेठेत नियम, अटींचे पालन करून शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:44+5:302021-01-13T04:58:44+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने यंदाची १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती प्रशासनाच्या नियम, अटींचे ...
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने यंदाची १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती प्रशासनाच्या नियम, अटींचे पालन करून साजरी केली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमासोबत कोरोना योद्ध्याचा सत्कार, गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि विधायक कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर हॉलमध्ये शनिवारी शिवाजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात तातडीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
सुजीत चव्हाण म्हणाले, शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांची जयंती थाटामाटातच साजरी करू, त्यांनी संकट काळात काय काम केले होते. त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे शिवजयंती काळात काम करता येईल. सविस्तर नियोजनासाठी लवकर आणखीन एक बैठक घेऊ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी १९ फेब्रुवारी रोजीच सर्वांनी शिवजयंती साजरी केली पाहिजे. यंदाच्या वेळी कोरोना असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करून विधायक कामांना प्राधान्य देऊ.
माजी नगरसेवक अजीत राऊत म्हणाले, वर्गणीतून जमा होणारे पैसे डिपॉझिट ठेवून त्यामाध्यमातून सामजिक उपक्रम राबवू. तसेच रक्तदान शिबिर, गरिबांना मदत असे वेगवेगळे उपक्रम यंदाच्या वेळी राबवू. माजी अध्यक्ष रोहित मोरे यांनी एखादा गडकिल्ला घेऊन स्वच्छता करू, विधायक कार्य हाती घेऊ, अशी सूचना केली. ॲड. अशोकराव साळोखे, शाहिर दिलीप सावंत, पंपू सूर्यवंशी, मोहन साळोखे, मंजीत माने, पिंटू साळोखे, सुहास साळोखे आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक सचिन चव्हाण, चंद्रकांत यादव, लालासो गायकवाड, सुरेश जरग आदी उपस्थित होते.
महत्त्वाची चौकट
शिवजयंती उत्साहातच झाली पाहिजे
देशभरात पदयात्रा, रॅली काढली जात आहेत. कोल्हापुरातही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. मग छत्रपतींच्या मिरवणुकीला निर्बंध का. जरी निर्बंध घातले तरी शिवाजी पेठेची शिवजयंती नेहमीप्रमाणे उत्साहातच झाली पाहिजे, अशी सूचना शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली.
फोटो : ०९०१२०२० कोल शिवाजी पेठ बैठक
ओळी : कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी शनिवारी बैठक झाली. सुजीत चव्हाण, अजीत राऊत, रविकिरण इंगवले, महेश जाधव, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.