शिवजयंती, मिरवणुका शांततेने पार पाडा

By admin | Published: May 6, 2016 12:40 AM2016-05-06T00:40:59+5:302016-05-06T01:12:43+5:30

इचलकरंजी परिसर : अखेरची मिरवणूक होईपर्यंत फलक हटविले जाणार नाहीत - सुरेश हाळवणकर

Shiva Jayanti, the procession passed peacefully | शिवजयंती, मिरवणुका शांततेने पार पाडा

शिवजयंती, मिरवणुका शांततेने पार पाडा

Next

इचलकरंजी : शहरात शिवजयंती साजरी करण्याविषयी उत्साह असला तरी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शिवजयंतीबरोबरच मिरवणुकाही पार पाडावयाच्या आहेत. अखेरची मिरवणूक पार पडेपर्यंत शहरात उभारण्यात आलेले डिजिटल फलक हटविले जाणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. मात्र, अफवांवर विश्वास न ठेवता शिवप्रेमींनी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहर, परिसरामध्ये शिवप्रेमींकडून यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा उत्साह अभूतपूर्व आहे. शिवाजी महाराजांच्या विविध प्रकारच्या छायाचित्रांनी आणि ऐतिहासिक प्रसंग सांगणारे अनेक डिजिटल फलक शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. विशेषत: मुख्य रस्ता व प्रमुख चौकांमधून फलकांची गर्दी आहे. अशा पार्श्वभूमीवर शिवजयंती आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका शांततेने पार पडाव्यात. जनतेने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, यासाठी राजीव गांधी सांस्कृतिक भवनामध्ये पोलिसांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील प्रमुख भाषणात आमदार बोलत होते. ते म्हणाले, शिवजयंतीनिमित्ताने अभूतपूर्व उत्साह वस्त्रनगरीमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, काहीजणांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न होत आहे. याला विशेषत: युवक वर्गाने बळी पडू नये. त्याचबरोबर चुकीचे संदेश देणारे फलक हटवावेत. त्या जागी शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास सांगणारे व प्रबोधनात्मक फलक लावावेत.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, संपूर्ण शहर शिवमय झाले आहे. विशेषत: युवक वर्गातून शिवजयंती साजरी करण्याचा उत्साह उत्स्फूर्त आहे. शिवजयंती साजरी करताना चांगला संदेश समाजासमोर गेला पाहिजे, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. या उत्सवाला गालबोट लागण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांचे मनसुबे उधळून लावावेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांमार्फत अफवा निर्माण होत असतात. त्यावर विश्वास ठेवू नये. पोलिस यंत्रणेला योग्य ते सहकार्य करावे.
पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, शहराची भौगोलिक स्थिती समजावून घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी म्हणून पोलिस संचलन करीत असतात. त्याबाबत कुणीही गैरसमज पसरू नये. मात्र, शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरबाबत लोकांच्या मनात राग निर्माण होत असेल, असे पोस्टर संबंधितांनी स्वत:हून काढून घ्यावेत. या पार्श्वभूमीवर ‘वाल्याचा वाल्मीकी’ होत असल्यास पोलिस त्यांना मदतच करतील, पण अशा व्यक्तींनी सकारात्मक जीवन जगण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत. शिवजयंती साजरी करण्याच्या उत्साहाला पोलिसांकडून विरजण घातले जाणार नाही. कोणतेही पोस्टर पोलिसांकडून उतरविले जाणार नाहीत. मात्र, शिवजयंती उत्साहपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने साजरी करावी की, ज्यामुळे पुढे वर्षभर आपणाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कोळी तथा बाळ महाराज म्हणाले, शिवजयंती शांततेने पार पाडण्याचे कर्तव्य आमचे आहे. त्यासाठी पोलिसांमागे सर्वांनी उभे राहावे. सज्जनपणाने राष्ट्रभक्ती दाखवीत शिवजयंती साजरी करावी. बैठकीमध्ये प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची भाषणे झाली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी मनीषा खत्री, डॉ. प्रशांत
रसाळ, प्रज्ञा पोतदार, तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, तसेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. विनायक नरळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


इचलकरंजीतील राजीव गांधी भवनात गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना आमदार सुरेश हाळवणकर. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, एस. चैतन्य, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मनीषा खत्री, आदी उपस्थित होते.

Web Title: Shiva Jayanti, the procession passed peacefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.