जादा दोन हजार लोकांना आजपासून शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:28+5:302021-04-17T04:24:28+5:30
कोल्हापूर : संचारबंदी काळात गरीब व गरजू लोकांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन योजनेतील थाळ्यांची संख्या व वेळ शुक्रवारपासून वाढवण्यात आली. ...
कोल्हापूर : संचारबंदी काळात गरीब व गरजू लोकांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन योजनेतील थाळ्यांची संख्या व वेळ शुक्रवारपासून वाढवण्यात आली. यापूर्वी कोल्हापुरात गरजवंतांना रोज ४ हजार थाळ्या वितरित केल्या जात होत्या. आता ही संख्या दीड पटीने वाढवून ६ हजार इतकी करण्यात आली आहे. भोजन वाटपाची वेळही एक तासाने वाढविण्यात आली आहे. ही योजना १४ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहील.
राज्यात सध्या ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी सुरू आहे. या काळात गरीब व गरजू लोकांची जेवणाची आबाळ होऊ नये, त्यांना पोटभर जेवण मिळावे यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलला एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचे जाहीर केले आहे. जेवण मोफत मिळत असल्याचे कळताच गेल्या दोन दिवसांपासून सर्वच शिवभोजन केंद्रांवर गरजूंची गर्दी होत असून वेळेआधीच थाळ्या संपत आहेत. अन्य गरजूंना मोफत जेवणाचा लाभ मिळत नसल्याने शुक्रवारी शासनाने प्रत्येक केंद्राला दीडपट थाळ्या वाढवून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हास्तरावर आदेश काढले. या काळात कोणताही लाभार्थी पार्सलशिवाय परत जाणार नाही, सबळ कारणाशिवाय केंद्र बंद राहणार नाही, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, तसेच खोट्या नावाने त्याच त्याच लाभार्थ्यांची छायाचित्रे ॲपवर टाकली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
खाऊ दे गरीब...
शिवभोजन केंद्रे :
कोल्हापूर शहर : ९
जिल्ह्यात : २५
रोज थाळी वाटप : ६ हजार
वेळ : ११ ते ४
योजना कधीपर्यंत : १४ मेपर्यंत
काय मिळते थाळीमध्ये
दोन चपात्या, एक वाटी भात, एक वाटी वरण व एक वाटी भाजी
(फोटो रांगेचा पाठवला आहे)