‘शिवराज्याभिषेक दिन’ हा सार्वभौमत्वाचा सोहळा - इंद्रजित सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:46 PM2020-05-30T22:46:04+5:302020-05-30T22:48:05+5:30

गडसंवर्धन झाले पाहिजे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे. - इंद्रजित सावंत

‘Shiva Rajyabhishek Din’ is a ceremony of sovereignty | ‘शिवराज्याभिषेक दिन’ हा सार्वभौमत्वाचा सोहळा - इंद्रजित सावंत

‘शिवराज्याभिषेक दिन’ हा सार्वभौमत्वाचा सोहळा - इंद्रजित सावंत

Next
ठळक मुद्दे इतिहास जपण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर : दि. ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या निमित्ताने दरवर्षी रायगडावर मोठा सोहळा होतो. लाखो शिवभक्त महाराजांच्या विचारांची ज्योत घेऊन गडउतार होतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेवरून वाद आहेत; त्यामुळे ती वर्षातून तीन वेळा साजरी होते; पण शिवराज्याभिषेक दिनाबद्दल इतिहासात स्पष्ट उल्लेख असल्याने हा दिवस एकत्र साजरा केला जातो. हा सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. या घडामोडीतील महत्त्वाचे शिलेदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची ही चर्चेतील मुलाखत...

प्रश्न : ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा करण्यास सुरुवात कशी झाली?
उत्तर : सुरुवातीला ‘शिवराज्याभिषेक दिन’ आरएसएस तसेच विशिष्ट वर्गाकडून ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणून साजरा केला जात होता. त्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम व्हायचा. शिवरायांचे स्वराज्य सार्वभौम होते. त्यात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हती किंवा धर्माचा अभिनिवेष नव्हता. त्यामुळे त्याचे होणारे धार्मिक ध्रुवीकरण आम्हांला मान्य नव्हते. शिवाय तो तिथीमुळे कोणत्याही महिन्यात साजरा व्हायचा. सगळ्यांनी एकत्र यावे यासाठी आम्ही तो तारखेवर आणला आणि २००० सालापासून शिवराज्याभिषेक दिन ६ जूनला साजरा होऊ लागला.

प्रश्न : हा दिवस लोकोत्सव करण्यामागे काय प्रेरणा होती?
उत्तर : आम्ही हा दिवस साजरा करायला सुरुवात केली तेव्हा रायगडावरदेखील मोजकी ५००-६०० माणसं असायची. शिवाजी महाराज हे कालातीत राजे आहेत. त्यांना केवळ महाराष्ट्रात किंवा विशिष्ट समाजापुरते मर्यादित का ठेवायचे? प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य, त्यांचे कार्य, विचार यांचा जागर व्हायचा असेल तर या दिवसाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात रुजले पाहिजे याची जाणीव झाली; म्हणून तो लोकोत्सव व्हावा अशी आमची इच्छा होती. या प्रेरणेतून कोल्हापुरात मराठा महासंघाच्या वतीने २००६ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.


आणखी काय बदल होणे अपेक्षित आहे
हा एक दिवसाचा उत्सव न होता गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे. रायगडावर मुख्य सोहळा होत असला तरी आता तो महाराष्ट्रासह परदेशातही साजरा होतो, हेही काही कमी नाही. यानिमित्ताने लोकांनी एकत्र येऊन विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. शिक्षण, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत चांगले काम करता येईल.


विचार कृतीत आणणे महत्त्वाचे

रायगडावर हा सोहळा सुरू झाला तेव्हा जिथे रिकामी मेघडंबरी होती तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी सगळ्यांची इच्छा होती. खासदार संभाजीराजे यांनी यात पुढाकार घेतला आणि २००९ मध्ये तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला. महाराजांची सोन्याची मूर्ती बनविण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणणे जास्त महत्त्वाचे आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवणे ही आता तरुण पिढीची जबाबदारी आहे. या निमित्ताने गडसंवर्धन झाले पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे.


 

Web Title: ‘Shiva Rajyabhishek Din’ is a ceremony of sovereignty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.