शिवभक्त रायगडकडे रवाना
By admin | Published: June 5, 2015 01:01 AM2015-06-05T01:01:10+5:302015-06-05T01:03:54+5:30
भवानी मंडप दुमदुमला : सुमारे २८ हजारजणांचा समावेश
कोल्हापूर : ‘जय भवानी... जय शिवाजी’चा जय जयकार... भिरभिरणारे भगवे ध्वज... अशा उत्साही वातावरणात गुरुवारी रात्री भवानी मंडपातून हजारो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडकडे रवाना झाले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रायगडावर आज, शुक्रवारी व उद्या शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांचे पूजन युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे. डी. जाधव, अमर पाटील, शिवाजी बसुगडे आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भवानी मंडप परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रायगडला रवाना होण्यासाठी रात्री नऊ वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शिवभक्त येत होते. तासाभरात शिवभक्तांची गर्दी झाली. भवानी मंडपामधून ४२ वाहनांसह २८ हजारांहून अधिक शिवप्रेमींनी रायगडाकडे कूच केली. जिल्ह्यातील विविध भागांत त्या-त्या ठिकाणी वाहनांचे ताफे राष्ट्रीय महामार्गावर एकत्र आले तेथून १५७ वाहनांचा एकत्रित ताफा रात्री साडेअकराच्या सुमारास रायगडाकडे रवाना झाला. (प्रतिनिधी)
भवानी मंडप दुमदुमला : सुमारे २८ हजारजणांचा समावेश