शिवाजी पूल, गॅस दाहिनीचे काम प्रगतिपथावर-उर्वरित कामे आठवड्यात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:26 AM2019-04-04T11:26:59+5:302019-04-04T11:28:29+5:30
पर्यायी शिवाजी पूल आणि पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिट दि.२६ मार्चला टाकण्यात आले आहे. आता सोमवारी पुलामध्ये बसविण्यात आलेल्या बेअरिंगच्या केबल्स मशीनद्वारे ओढून पुढील काम करण्यात येणार आहे. त्याशिवाय पंचगंगा स्मशानभूमीत बसविलेल्या गॅस दाहिनीच्या फौंडेशनचे
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल आणि पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिट दि.२६ मार्चला टाकण्यात आले आहे. आता सोमवारी पुलामध्ये बसविण्यात आलेल्या बेअरिंगच्या केबल्स मशीनद्वारे ओढून पुढील काम करण्यात येणार आहे. त्याशिवाय पंचगंगा स्मशानभूमीत बसविलेल्या गॅस दाहिनीच्या फौंडेशनचे काम पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण झाले असून येत्या चार दिवसांत त्यावर धूर जाण्यासाठी सुमारे ६५ फूट उंचीची चिमणी बसविण्याचे काम सुरू होत आहे.
पर्यायी शिवाजी पुलाचे काम अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर पूर्णत्वाकडे जात आहे. या पुलाच्या अखेरच्या स्लॅबचे काँक्रिटचे काम दि. २६ मार्चला दिवसभरात पूर्ण झाले. त्यानंतर सोमवारपासून या पुलात घातलेल्या बेअरिंग्जमधील केबल्स मशीनद्वारे ओढून त्यात ताकद निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाचा कठडा तयार करणे, जुन्या ठेकेदारांनी केलेल्या पुलाच्या कठड्याची उंची वाढविणे, पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस काही भाग काँक्रिटचा कोबा करणे, मुरूम टाकणे, डांबरीकरण आदी कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, कोल्हापुरात महापालिकेच्या तीन स्मशानभूमीत दरवर्षी सुमारे साडेतीन हजार मृतदेहांचे दहन केले जाते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगाराव्यतिरिक्त सुमारे ३५ लाख रुपये खर्च करावा लागतो. या खर्चाला फाटा देण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे.
हे दाहिनीचे कामही मधल्या टप्प्यात रेंगाळले असले तरी आता ते युद्धपातळीवर सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी या गॅस दाहिनीच्या धुरांड्याच्या चिमणीसाठी फौंडेशन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह दहनानंतर त्याच्या वायूचे हवेतच विघटन व्हावे या उद्देशाने त्या फौंडेशनवर सुमारे ६५ फूट उंच चिमणी बसविण्यात येणार आहे. हे काम चार दिवसांत सुरू होत आहे. या गॅस दाहिनीची चाचणीही घेण्यात आली आहे. त्यामुळे ही गॅस दाहिनी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.