शिवाजी पूल फेब्रुवारीत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:26 AM2018-11-20T00:26:48+5:302018-11-20T00:26:52+5:30
कोल्हापूर : निवडणूक तोंडावर असल्याने पर्यायी शिवाजी पूल पूर्ण करण्याची घाई गडबड करू नका, कालावधी वाढला तरी चालेल, पण ...
कोल्हापूर : निवडणूक तोंडावर असल्याने पर्यायी शिवाजी पूल पूर्ण करण्याची घाई गडबड करू नका, कालावधी वाढला तरी चालेल, पण पुलाचे काम दर्जेदार करा, अशा सूचना सर्वपक्षीय कृती समितीच्या निमंत्रकांनी ठेकेदार व राष्टÑीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी कामाचा वेग पाहता हा पूल फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी व्यक्त केली.
पर्यायी शिवाजी पुलाचे काम वेगवान सुरू असले तरीही काम दर्जेदार झाले आहे का? पिलरसाठी योग्य पद्धतीचे मान्यताप्राप्त साहित्य वापरले जात आहे का? याची पाहणी करण्यासाठी व अधिकारी, ठेकेदारांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्यायी पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, नगरसेवक तसेच कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आदींचा सहभाग होता.
विविध कारणांनी रेंगाळलेले पर्यायी शिवाजी पुलाचे उर्वरित बांधकाम आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीमार्फत सुरू आहे, त्याचे कोल्हापुरातील प्रतिनिधी एन. डी. लाड हे या पुलाचे ठेकेदार आहेत. सध्या पुलाच्या पिलरचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. सोमवारी सकाळी महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक , सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी पुलावर येऊन कामाचा दर्जा तपासला. यावेळी कामासाठी वापरले जाणारे साहित्य, पूर्णत्वासाठी लागणारा वेळ, आदींबाबत ठेकेदार व अधिकाºयांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या.
महापौर बोंद्रे यांनी पुलाचे काम घाई गडबडीत आटोपते घेण्यापेक्षा कामाच्या दर्जावर ठेकेदाराने लक्ष द्यावे, चांगल्या प्रतीचे साहित्य वापरावे, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूल करण्यासाठी दबाव आल्यास झुगारून टाका, अशा सूचना केल्या.
यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, संजय मोहिते, अर्जुन माने, शेखर कुसाळे, भूपाल शेटे यांच्यासह बाबा पार्टे, वसंतराव मुळीक, सुभाष जाधव, पारस ओसवाल, अशोक पोवार, लाला गायकवाड, किशोर घाटगे, दिलीप माने, प्रसाद जाधव, अशोक भंडारे, भगवान काटे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, विजय करजगार, दिलीप माने, रमेश मोरे, आदींचा समावेश होता.