शिवाजी, दिलबहार ‘अ’ची आगेकूच

By admin | Published: March 19, 2017 12:42 AM2017-03-19T00:42:24+5:302017-03-19T00:42:24+5:30

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : चुरशीच्या सामन्यात कोल्हापूर पोलिस पराभूत

Shivaji, Dilbahar A ahead of A | शिवाजी, दिलबहार ‘अ’ची आगेकूच

शिवाजी, दिलबहार ‘अ’ची आगेकूच

Next

कोल्हापूर : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी शिवाजी तरुण मंडळाने कोल्हापूर पोलिस संघाचा २-१ ने; तर दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने साईनाथ स्पोर्ट्सचा २-० ने पराभव करीत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
शाहू स्टेडियम येथे पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ व कोल्हापूर पोलिस यांच्यात झाला. शिवाजी तरुण मंडळाकडून १४ व्या मिनिटाला निखिल जाधवने गोल करीत १-० अशी आघाडी आपल्या संघास मिळवून दिली. या गोलनंतर पोलिस संघाकडून १८ व्या मिनिटास किसन ठाणेकरने गोल करीत सामन्यात १-१ बरोबरी साधली.
‘शिवाजी’कडून कपिल साठे, ऋतुराज पाटील, आकाश भोसले, वैभव राऊत, सुमित जाधव यांनी; तर पोलिस संघाकडून युवी ठोंबरे, गणेश दाते, अरबाज शेख यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. उत्तरार्धात ३८ व्या मिनिटास पोलिस संघाच्या गोलक्षेत्रात अक्षय व्हरांबळेने चेंडू अवैधरीत्या हाताळला. याबद्दल पंचांनी शिवाजी संघास पेनल्टी बहाल केली. यावर आकाश भोसलेने गोल नोंदवीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. ही गोलसंख्या कायम राखत सामना ‘शिवाजी’ने जिंकला.
दुसरा सामना दिलबहार ‘अ’ व साईनाथ स्पोर्टस यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार ‘अ’चेच वर्चस्व राहिले. चौथ्या मिनिटास जावेद जमादारच्या पासवर सनी सणगरने गोल नोंदवत १-० अशी आघाडी घेतली. या गोलनंतर ‘साईनाथ’कडून नीलेश साळोखे, युवराज पाटोळे, स्वप्निल भोसले, आशितोष मंडलिक, प्रदीप पाटील, तुषार पुनाळकर यांनी बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा दिलबहार ‘अ’च्या बचावफळीपुढे टिकाव लागला नाही. उत्तरार्धात ‘दिलबहार’कडून ४४ व्या मिनिटास रणवीर जाधवने गोल
करीत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली.
‘दिलबहार’कडून जावेद
जमादार, रोहन आडनाईक, करण चव्हाण-बंदरे, साहील निंबाळकर
यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. अखेरपर्यंत २-० हीच गोलसंख्या कायम ठेवत सामना ‘दिलबहार’ने सहज खिशात घातला.


आजचा सामना
दु. ४ वा. : पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ


शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ व साईनाथ स्पोर्ट्स यांच्यात झालेल्या सामन्यातील क्षण.

Web Title: Shivaji, Dilbahar A ahead of A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.