घरात साजरी केली शिवजयंती, वडणगे येथील विजय पाटील यांचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:07 PM2019-02-18T20:07:51+5:302019-02-18T20:09:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करतो. सामूहिकरित्या शिवजयंती साजरी तर केली जातेच, परंतु शिवजयंती घराघरांत, शिवजयंती मनामनांत या संकल्पनेतून वडणगे येथील विजय शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेतच अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
न्यायालयामध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या विजय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची आणि कर्तृत्वाची आठवण कायम तेवत ठेवण्यासाठी वडणगे येथील आपल्या घरातील हॉलमध्ये शिवरायांची भव्य मूर्ती उभी करून त्याभोवती देखणी आरास केली आहे. ही आरास पहायला ग्रामस्थांसह अनेकजण त्यांच्या घराला भेट देत आहेत.
शिवपुतळ्यासह दांडपट्टा, तोफांच्या प्रतिकृती
कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र विजय पाटील यांनी घरात स्थापित केले असून, त्यातील दांडपट्टा, भाले, बेलाचे पान, तलवार, मोरचेल, दोन तोफा यांच्या प्रतिमा स्वत: त्यांनी बनवल्या आहेत. याशिवाय कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हुबेहुब प्रतिकृती आणि दगडी चबुतराही घरात तयार करून घेतला आहे. पुढील वर्षी भवानी तलवारीची प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.
केवळ वर्षातून एकदा शिवजयंती साजरी न करता रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कर्तृत्वाचे स्मरण व्हावे व प्रत्येकजण शिवविचाराने प्रेरित व्हावा, यासाठीच ही धडपड आहे.
विजय शिवाजीराव पाटील,
वडणगे
(वाहनचालक, न्यायालय, कोल्हापूर)