शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:30 AM2022-02-16T11:30:37+5:302022-02-16T11:46:04+5:30

शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

Shivaji Jayanti processions are not allowed, Shivaji Peth insists on taking out the procession | शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१९) प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणूक काढण्यावर बंदी असणार आहे. मात्र, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले. कोरोना संसर्ग कमी झालेला असल्यामुळे पेठेतील नागरिक तसेच शिवभक्त प्रशासनाचा आदेश मानण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी शिवजयंती उत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. याअंतर्गत शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी असला तरी अजूनही प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत, गर्दीमुळे पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अनेक शिवप्रेमी शिवनेरी तसेच अन्य गड-किल्ल्यांवर जाऊन किंवा शहरात १८ तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात.

मात्र, यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये. मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम न घेता केबल किंवा ऑनलाइन प्रक्षेपण करावे. आरोग्यविषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा दिवस साजरा करावा असे, आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शिवाजी पेठ मिरवणूक काढण्यावर ठाम 

दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक अजित उर्फ पिंटू राऊत यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी कोरोनाचे संकट अद्याप असून मिरवणूक न काढता मंडळाच्या परिसरात प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.

मात्र, यावर्षी पेठेतील नागरिक तसेच शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम आहेत. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे सांगितले. मिरवणूक ही निघणारच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

पन्हाळ्यावर शिवजयंतीनिमित्त शिवज्योत नेणाऱ्या शिवभक्तांवर तहसीलदार व नगरपरिषद प्रशासनाने निर्बंध घातल्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी जाहीर केले. बुधवार पेठ ते पन्हाळा शहर हा मुख्य रस्ता गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने हा रस्ता दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक व चालत जाण्याकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पर्यायी रस्ता बुधवार पेठ ते रेडेघाटी ते लता मंगेशकर बंगला ते अंधारबाव असा मार्ग सुरू असून हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर फक्त दुचाकी वाहनांना व पायी येणाऱ्या शिवभक्तांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग सोय बुधवारपेठ येथील पन्हाळा पब्लिक स्कूल व हॉटेल पूजा ग्रीनलँड येथे करण्यात आली आहे.

Web Title: Shivaji Jayanti processions are not allowed, Shivaji Peth insists on taking out the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.