‘शिवाजी’ पुढील फेरीत
By Admin | Published: March 23, 2015 12:47 AM2015-03-23T00:47:41+5:302015-03-23T00:47:41+5:30
दसरा कप फुटबॉल स्पर्धा : कोल्हापूर पोलीस टायब्रेकरवर पराभूत
कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने कोल्हापूर पोलीस संघाचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करत दसरा कप फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली. छत्रपती शाहू स्टेडियम येथे रविवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीस संघ यांच्यात झालेल्या सामन्यात प्रारंभापासून ‘शिवाजी’चेच वर्चस्व होते. यामध्ये स्वप्निल पाटील, मंगेश भालकर, वैभव राऊत, चिंतामणी राजवाडे, प्रमोद राऊत यांनी खोलवर चढाया करत पोलीस संघावर दबाव निर्माण केला. तिसऱ्या मिनिटास प्रमोद राऊतच्या पासवर स्वप्निल पाटीलने गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एक गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पोलीस संघाकडून विनायक चव्हाण, सोमनाथ लांबोरे, सागर भोसले, युक्ती ठोंबरे, अमोल चौगुले, रोहित ठोंबरे यांनी सामना बरोबरीत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न सजग शिवाजी तरुण मंडळाच्या बचावफळीने निष्प्रभ ठरविले. ‘शिवाजी’च्या अमृत हांडेने मोठ्या डीमध्ये चेंडू हाताळला. याबद्दल पोलीस संघास पंच राजू राऊत यांनी पेनल्टी बहाल केली. यावर पोलीस संघाच्या विनायक चौगलेने आयती आलेली गोल करण्याची संधी बाहेर फटका मारून वाया घालवली.
उत्तरार्धात ‘शिवाजी’कडून चिंतामणी राजवाडे याने आघाडी वाढविण्याची आलेली सोपी संधी वाया घालवली. ५९ व्या मिनिटास पोलीस संघाच्या सागर भोसलेने कॉर्नर किकद्वारे दिलेल्या पासवर रोहित ठोंबरेने गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. अखेरपर्यंत १-१ अशी बरोबरी राहिल्याने सामन्याचा निकाल पंचांनी टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. ‘शिवाजी’कडून अमृत हांडे, आकाश भोसले, वैभव राऊत, संदीप पोवार, तर पोलीस संघाकडून संतोष तेलंग, सागर भोसले, सोमनाथ लांबोरे यांनी गोल नोंदवले. शुभम संकपाळ, युक्ती ठोंबरे यांचे फटके वाया गेल्याने हा सामना शिवाजी मंडळाने ४-३ असा जिंकला.