शिवाजी पेठेत स्वागत कमानीवरून दगडफेक
By admin | Published: September 11, 2016 01:13 AM2016-09-11T01:13:10+5:302016-09-11T01:13:23+5:30
दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
कोल्हापूर : गणेश स्वागत कमानीवरून शिवाजी पेठेतील महाकाली तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संध्यामठ परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पेठेत संध्यामठ गल्लीत संध्यामठ तरुण मंडळ व महाकाली तालीम मंडळ आहे. शनिवारी सकाळी गणेश स्वागत कमानीवरून दोन्ही मंडळांत वाद झाला. या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले. हा प्रकार समजताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिस आल्याचे पाहून जमावाची पांगापांग झाली. त्यामुळे वातावरण निवळले. घटनेनंतर दोन्ही तालीम मंडळांचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दुपारी पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. याप्रकरणी दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. शेवटी सायंकाळी दोन्ही मंडळांच्या दहा कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना समज दिली. दरम्यान, दोन्ही तालीम मंडळांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याजवळ थांबून होते.
शिवाजी पेठेतील दोन तालीम मंडळांमध्ये किरकोळ वाद झाला होता. याप्रकरणी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना लेखी समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
- अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे, कोल्हापूर.