शिवाजी पेठेत पत्नीने केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:14 AM2019-01-21T01:14:56+5:302019-01-21T01:15:00+5:30
कोल्हापूर : कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्याच्या संशयावरून सतत मारहाण करीत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरी ओढणीने गळा ...
कोल्हापूर : कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्याच्या संशयावरून सतत मारहाण करीत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरी ओढणीने गळा आवळत फरशीवर डोके आपटून पतीचा खून केल्याची घटना रविवारी साकोली कॉर्नर येथे घडली. सागर नारायण बोडके (वय ३२, रा. जिव्हाळा संकुल, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित पत्नी निर्मला सागर बोडके (वय ३०) हिला अटक केली. तिने पोलिसांत खुनाची कबुली दिली. या घटनेने शिवाजी पेठेच्या परिसरात खळबळ उडाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सागर बोडके याचा साकोली कॉर्नर येथील जिव्हाळा संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे. वडील शासकीय नोकरीत होते. त्यांनी २० वर्षांपूर्वी तो खरेदी केला होता. सुरुवातीला आईचे त्यानंतर सात महिन्यांपूर्वी वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे या ठिकाणी तो पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी गौरी यांच्यासोबत राहत होता. त्याने घरापासून काही अंतरावर गाळा भाड्याने घेऊन कपडे व बॅगा दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. दारूच्या आहारी गेल्याने तो गेल्या दोन वर्षांपासून दुकानात जात नव्हता. दिवस-रात्र दारू पिऊन असे. त्यामुळे पत्नी निर्मला दुकान चालवीत असे. तो कामधंदा करीत नसल्याने घरची जबाबदारी निर्मला हिच्यावर होती. तिच्याकडे तो दारूसाठी पैसे मागत असे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो भांडण काढत असे. गेल्या वर्षभरापासून तो पत्नीला चारित्र्याचा संशय घेत मारहाण करीत होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला. निर्मला व मुलगी गौरी घरी होत्या. त्याने पुन्हा चारित्र्याचा संशय घेत भांडण काढले. यामध्ये दोघांची झटापट झाली. यावेळी निर्मलाने फरशीवर त्याचे डोके आपटल्याने सागर गंभीर जखमी झाला. यानंतर निर्मलानेच त्याला बेडवर ठेवले. त्यानंतर ओढणीने त्याचा गळा आवळला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर ती दरवाजाला बाहेरून कडी लावून मुलगी गौरीला घेऊन शेजारी राहत असलेल्या रोहित गणेश साळोखे यांच्या घरात गेली. ‘मी पतीला मारलंय. मुलीला तुमच्याजवळ ठेवून घ्या. मी पोलीस ठाण्यात निघालोय,’ असे तिने त्यांना सांगितले. हे ऐकून रोहित यांनी खाली येऊन माजी आमदार सुरेश साळोखे यांचा मुलगा अवधूत यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ जुना राजवाडा पोलिसांना सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल शाहू तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. निर्मला ही इमारतीमधून बाहेर पडूत उर्मिला चित्रपटागृहासमोर भेदरलेल्या अवस्थेत थांबून होती. तेथून तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता सागर बेडवर निपचित पडला होता. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना पोलिसांनी कळविले. खोचे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी आले. त्यांनी खोलीचा पंचनामा केला. त्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरापर्यंत संशयित निर्मला हिच्याकडे पोलीस चौकशी करीत होते. पोलिसांनी मुलगी गौरी हिला सावरत तिच्याकडेही चौकशी केली. शेजारील लोकांचे जबाब नोंदविले.
खोलीतील अवस्था
सागर बोडके हा बेडवर पडला होता. त्याच्या पायांशेजारी औषधांची पाकिटे पडली होती. गळ्याभोवती ओढणी गुंडाळली होती. डोक्याला जखम होती. त्यातून रक्तस्राव होत होता. बेडसमोर असलेल्या स्टुलावर कांदा चिरण्याचा चाकू होता. खोलीतील साहित्य विस्कटलेले होते. डोक्यातील जखम आणि गळ्याभोवती व्रण असल्याने रक्तस्राव आणि गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मी मरतो, तुलाही मारतो...
सागर हा दिवसभर मी आज मरणार आहे, अशी धमकी देत होता. तो सुरुवातीला ‘मी मरतो, तुलाही मारतो’ असे म्हणत मारहाण करू लागला. झटापटीमध्ये मलाही जखम झाली आहे. रोज दारू पिऊन तो माझ्यावर चारित्र्याचा संशय घेत होता, अशी कबुली निर्मलाने पोलिसांत दिली आहे. सागर याच्या तोंडाचा उग्र वास येत होता. त्याने विष प्राशन केले की पाजले, त्याचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापतीने की गळा आवळल्याने झाला, हे सर्व शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.