कुणामागे जायचं शिवाजी पेठेला चांगलं कळतं
By admin | Published: August 26, 2016 11:55 PM2016-08-26T23:55:12+5:302016-08-27T00:46:52+5:30
हद्दवाढ समर्थकांची पेठेत बैठक : चंद्रदीप नरकेंना नेत्यांनी फटकारलं
कोल्हापूर : शिवाजी पेठेची जनता सुज्ञ असून, तिला कोणाच्या मागे जायचं हे चांगलं कळतंय. पेठेतील जनतेने ज्या आंदोलनांत भाग घेतला, ती यशस्वी झाली आहेत. हद्दवाढीसंदर्भातील आंदोलनही यशस्वी होईल. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांनी चुकीचे वक्तव्य करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शिवाजी पेठेतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या मेळाव्यात करण्यात केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ आंदोलनात शिवाजी पेठेतील तालीम, मंडळे नेत्यांच्या मागे नसून ती आपल्या पाठीशी आहेत, असे वक्तव्य आमदार चंद्रदीप नरके यांनी नुकतेच केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि शिवाजी पेठेतील जनता, तालीम, मंडळे ही हद्दवाढीच्या मागणीशी ठाम असल्याचे दाखवून देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात आमदार नरके यांना अनेक नेत्यांनी फटकारले. पेठेत राहून पेठेतील जनतेबद्दल चुकीचे वक्तव्य करणे हा पेठेच्या अस्मितेला धक्का असल्याचे सांगत नरके यांचा निषेध करण्यात आला.
पेठ विकासात अग्रेसरच
नरके सांगतात म्हणून पेठेची जनता त्यांच्या मागे नाही. कोणाच्या मागे जायचं हे इथल्या जनतेला चांगलं कळतंय. शिवाजी पेठ ही आतापर्यंत चांगल्या कामांत अग्रेसर राहिली आणि शहराच्या विकासातही ती पुढेच राहील, असे मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ चव्हाण म्हणाले. शहरात राहून शहराविरोधात भूमिका घ्यायची आणि पेठेतील जनतेबद्दल गैरसमज पसरविणारे वक्तव्य करायचे हे बरोबर नाही. आमदार नरके यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी केले.
शिवाजी पेठेबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम नरके यांनी थांबवावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. शिवाजी पेठेतील सर्व मंडळे ही हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचा आंदोलनास सक्रिय पाठिंबा आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रामाणे, माजी महापौर आर. के. पोवार, विलासराव सासने, राजू लाटकर, शिवाजीराव जाधव, सतीश कांबळे, अजित राऊत यांची भाषणे झाली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, परिवहन सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, अमोल माने, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कधी जिना उतरून खाली आला का?
नरके हे शिवाजी पेठेत राहतात; पण पेठेसाठी त्यांचे योगदान काय? असा प्रश्न आम्ही कधी विचारत नाही. जर तुमच्या मागे तालीम, मंडळं असतील तर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या एका तरी मंडळाचे पत्र आणावे, असे आव्हान माजी नगरसेवक रवी इंगवले यांनी दिले. पेठेत काय घडलं तर कधी जिना उतरून खाली आला होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दादांचे शेरोशायरीने उत्तर
रामभाऊ चव्हाण यांचं भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखंच रांगडं! त्यांनी आपल्या भाषणाची सांगता चक्क शेरोशायरीने केली. ‘आसूॅँओं से लिखता हूॅँ, पागल मत समझना; शिवाजी पेठ के कार्यकर्तांओं के किए तडपता हूॅँ, पागल नहीं समझना’, अशा शब्दांत आमदार नरके यांना उत्तर देताच दादांच्या या शायरीला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.