शिवाजी पेठेत शिवोत्सव! भव्य मिरवणूक : पारंपरिक थाटासह रोषणाईचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:16 AM2018-02-20T01:16:01+5:302018-02-20T01:17:40+5:30
कोल्हापूर : पारंपरिक गणवेशातील मावळ्यांनी दिलेली तुतारीची सलामी, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष, फडफडणारे भगवे झेंडे त्यातच डोळे दीपवणाऱ्या अत्याधुनिक विद्युत रोषणाईचा तिरंगी प्रकाशझोत, ‘एकच छत्रपती-दैवत
कोल्हापूर : पारंपरिक गणवेशातील मावळ्यांनी दिलेली तुतारीची सलामी, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष, फडफडणारे भगवे झेंडे त्यातच डोळे दीपवणाऱ्या अत्याधुनिक विद्युत रोषणाईचा तिरंगी प्रकाशझोत, ‘एकच छत्रपती-दैवत छत्रपती’चा पोवाडा, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, अश्वारूढ बालशिवाजी, आदी लवाजम्यासह पारंपरिक वाद्यातील श्री शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक सोमवारी सायंकाळी उत्साहात झाली. मिरवणुकीतील भव्य अश्वारूढ पुतळा साऱ्यांसाठी लक्षवेधी ठरला.
शिवजयंतीनिमित्त शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य अश्वारूढ शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, , पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आदी प्रमुख उपस्थितीत होते. त्यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करण्यात आला. सुमारे १४ तुतारीच्या निनादात सलामी देत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीत उभा मारुती चौक ते निवृत्ती चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्हीही बाजूंच्या इमारतीवरून अश्वारूढ शिवपुतळ्यावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात येत होती. या मिरवणुकीत शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे मान्यवर, तसेच भगव्या साड्या, भगवे फेटे घालून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. खासदार धनंजय महाडिक यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना थक्ककेले.
मिरवणूक उभा मारुती चौक, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईनमार्गे महापालिका, शिवाजी चौकामार्गे बिंदू चौकापर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सुरेश जरग, उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल बोंगाळे, उपाध्यक्ष अशोक देसाई, अजित खराडे, नगरसेवक अजिंक्य चव्हाण, राहुल माने, प्रतापसिंह जाधव यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, चंद्रकांत यादव, वसंतराव मुळीक, वस्ताद आनंदराव ठोंबरे, किशोर घाटगे, अशोकराव साळोखे, शिवसेना शहराध्यक्ष शिवाजी जाधव, विक्रम जरग, अजित चव्हाण आदी मान्यवर सहभागी झाले होते.
‘विकासाच्या आडवेपडूंना पुरस्कार द्या’
विकासात्मक योजना, नवीन उद्योग, रस्ता, पूल, घरकुल योजना, हॉस्पिटल, प्रकल्प या विषयाच्या ‘आडवे आलेच’ असा लक्षवेधी फलक बैलगाडीत ठेवला होता. ‘यांच्या’ आंदोलनाला लागतोय विषय कोल्हापूरचं वाटोळं करायचा केलाय यांनी निश्चय! अशा या आडवेपडूंच्या सततच्या त्रासामुळे कोल्हापूर नाव झालयं बदनाम! त्यामुळे कोल्हापुरात नवीन काही येत नाही किंवा होत नाही म्हणून या आडवेपडूंना हा पुरस्कार देऊ...’ असा टीका करणारा फलक चर्चेचा विषय बनला होता.
प्रबोधनात्मक फलक
शहरातील वाढती गुन्हेगारी अपुºया पोलीस चौकी, खंडपीठाचा रेंगाळलेला प्रश्न, रंकाळ्याचं दुखणं आणि निधीच्या आकड्यांचा झोल, रस्त्याचे बनले बोळ, पंचगंगा प्रदूषण, मराठ्यांना आरक्षण आदी प्रश्नांना वाचा फोडणारे प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीत लक्ष वेधत होते. हे फलक २० बैलगाड्यांवर उभारले होते.
तोडफोडीवरही टीकास्त्र
‘सामाजिक प्रदूषण या नावाखाली निमित्ताला टेकलेल्यांनी घेतला दंगलीचा आधार...दगड टाकताना करा दहादा विचार... पुरोगामी शाहूनगरी ही आता सहन नाही करणार’ असा जातीय दंगलीतील तोडफोडीवर भाष्य करणारा फलक विशेष लक्ष वेधत होता.
मिरवणुकीत तुतारीचा निनाद
मिरवणुकीत कºहाड येथील शिवयोद्धा तुतारी वादक गु्रपचे सुमारे १४ युवक मावळ्यांच्या गणवेशात तुतारीचा निनाद करत होते. याशिवाय भित्तमवाडीतील भगव्या गणवेशात युवक-युवतींचे मोरया बॉईज झांजपथक, संगमेश्वरचा ब्रॉस बँड तसेच साऊंड सिस्टीम व तिरंगा एलईडी लाईटचा प्रकाशझोत मिरवणुकीवर टाकला जात होता. यामुळे मिरवणुकीचा थाट वाढला.
शिवकालीन गणवेश
या मिरवणुकीत शिवकालीन गणवेशात सुमारे ५० मावळ्यांचा सहभाग होता तर दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीवर शिवकालीन सजीव देखावेही मिरवणुकीत सहभागी केले होते. याशिवाय अनेक घोड्यांवर बालशिवाजी आणि जिजाऊंचे सजीव देखावे साकारले होते.