शिवाजी पेठेची लढवय्या ‘सरदार’ तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:54 PM2019-11-03T23:54:03+5:302019-11-03T23:54:07+5:30
सचिन भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुरोगामी वसा आणि वारसा लाभलेल्या करवीरनगरीत अनेक तालीम संस्था आहेत. या ...
सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरोगामी वसा आणि वारसा लाभलेल्या करवीरनगरीत अनेक तालीम संस्था आहेत. या प्रत्येक तालीम संस्थेला स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. यात कुस्ती, फुटबॉल, हॉकीपर्यंत आणि राजकारणापासून सामाजिक चळवळीपर्यंतचा वसा जपणारी १६२ वर्षांची परंपरा लाभलेल्या शिवाजी पेठेतील ‘सरदार’ तालमीचे नावही अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आजही तालमीच्या नव्या शिलेदारांनी काळानुरूप बदल करीत चांगले तेच अंगीकारले आहे. ही वैभवशाली परंपरा कायम राखली आहे.
पूर्वी नवा बुधवार पेठ म्हणून सध्याच्या शिवाजी पेठेची करवीर संस्थानात नोंद होती. या पेठेतील युवक निर्भीड, ताकदवान, धाडसी असल्याने घरटी एक तरी जवान त्या काळात संस्थानाच्या सैन्यदलात होता. याच दरम्यान इंग्रजांच्या दप्तरीही त्यांची सरदार अशी नोंद होती. या सरदार नावामुळे या परिसरातील तालमीला ‘सरदार तालीम’ असे नाव पुढे पडले. खऱ्या अर्थाने तालमीची स्थापना ९ आॅगस्ट १८५७ साली झाल्याची नोंद आहे. प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालमीने आजपर्यंत इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जपल्या आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालमीत अनेक नररत्न होऊन गेले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कुस्ती व मर्दानी खेळात तालमीचे नाव चर्चेत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मर्दानी खेळ पथकातील कार्यकर्त्यांना परराज्यात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मर्दानी खेळाबरोबरच पहाटेपासून मल्लांच्या शड्डूंचे आवाज या तालमीत घुमत होते. यात मूळचे पुण्याचे नामांकित मल्ल किशाबापू लकडे हेही याच तालमीत घडले. राजर्षींचे सर्वांत लाडके पैलवान असलेले नारायण कसबेकरही याच तालमीत तयार झालेले मल्ल होते. तालमीचे वस्ताद दिनकरराव सासने यांचा आदरयुक्त दरारा काही निराळाच होता, तर महादेव साळोखे, बाबूराव साळोखे, सदाशिव सासने, गणपत सासने, दादोबा सूर्यवंशी, आनंद राऊत, दत्ता बुवा, वाय. डी. इंगवले, तुकाराम इंगवले, शामराव सासने, विलास भोसले, हरिभाऊ साळोखे, हिंदुराव सासने, नायकू साळोखे, शंकर सासने, पांडुरंग सासने यांनीही तालमीची परंपरा कायम राखली. दिनकरराव सासने वस्ताद, बापूसाहेब ऊर्फ दत्तात्रय साळोखे-कसबेकर हे दोघेही पुढे कोल्हापूरच्या कुस्तीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्षही होते. दत्ता बुवा हे तालमीचे अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तालीम म्हटले की मल्ल आणि खेळातच अनेकजण असणार असे गृहीत धरतात. मात्र, शैक्षणिक क्षेत्रातही याच तालमीचे आर. वाय. पाटील हे उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व, तर माधवराव सासने स्काऊट चळवळीत अग्रभागी होते. कोल्हापूरच्या फुटबॉलची परंपरा जपणाºया नामांकित शिवाजी तरुण मंडळाच्या संस्थापकांपैकी एक ज्येष्ठ विचारवंत व शेकापचे आमदार पी. बी. साळोखे हेही याच तालमीचे मल्ल होते. अशा एक ना अनेक व्यक्तींनी आपल्या कार्यातून तालमीची छाप पाडली आहे. हीच परंपरा आजही कायम ठेवत तालमीचे कार्यकर्ते रवींद्र साळोखे, श्रीधर जाधव, बाजीराव पाटील हे सध्या पोलीस उपअधीक्षक, तर सहायक पोलीस निरीक्षक दीपाली साळोखे-जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक रोहन सासने, प्रशांत इंगवले, तर क्रीडा क्षेत्रात फुटबॉलच्या फॅक्टरीचे कोच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, नामांकित फुटबॉलपटू व प्रशिक्षक व के.एस.ए.सारख्या फुटबॉलच्या मातृसंस्थेचे सचिव प्रा. अमर सासने हेही याच तालमीचे कार्यकर्ते होय. एवढंच काय, आंतरराष्ट्रीय नेमबाज व युवा आॅलिम्पियन शाहू तुषार माने व स्केटिंगमध्ये ग्रिनिज वर्ल्ड बुकात नोंद झालेली स्केटर श्रीया राकेश देशपांडे याच तालमीचे पट्टे आहेत.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातही तालमीच्या कार्यकर्त्यांचा ठसा आहे. तालमीने दीडशे वर्षांच्या काळात हिंदू-मुस्लिम ऐक्याची बांधीलकी जपली आहे. अनेकवेळा मोहरम व गणेशोत्सव एकत्रित साजरे केले जातात. गणेशोत्सवात शिस्तबद्ध तालीम म्हणून या तालमीकडे कोल्हापूरकर आवर्जून पाहतात. गणेश विसर्जन मिरवणुकीत वेगळेपण जपले आहे. समाजप्रबोधन व्हावे, असे देखावे मिरवणुकीत सादर केले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीकरिताही तालमीचे कार्यकर्ते अग्रभागी होते. गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, योग शिबिर, स्मशानभूमीस शेणी दान असे उपक्रम तालमीचे कार्यकर्ते दैनंदिन कामकाज सांभाळून करीत आहेत. सद्य:स्थितीत बाबा कसबेकर, बाबा चव्हाण, मोहन साळोखे, प्रा. अमर सासने, विजय साळोखे, आदी कार्यभार सांभाळीत आहेत.
तालमीचे
नूतनीकरण
माजी आमदार मालोजीराजे व तत्कालीन खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या योगदानातून तालमीचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वीचा बाज राखण्यासाठी अत्यंत देखणी अशी चिºयातील दुमजली इमारत बांधण्यात आली. यात स्पर्धा परीक्षा देणाºया परिसरातील मुला-मुलींकरिता अभ्यासिका, आखाडा, अशी देखणी इमारत बांधण्यात आली.
ऐक्याची परंपरा
शिवाजी पेठेत राहणाºया मुस्लिम बांधवांची संख्या लक्षात घेता तालमीमध्ये सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ज्येष्ठ मंडळींनी चाँदसाहेब पंजाची स्थापना केली. पंजाची मूळ गादी शिरदवाड येथे आहे. आकर्षक भरजरी वस्त्र, दैनंदिन पूजेसाठी उपस्थित राहणारे हिंदू-मुस्लिम बांधव हे वैशिष्ट्य आहे. आजही ही परंपरा आजच्या कार्यकर्त्यांनी जपली आहे.
तालमीचा असाही पठ्ठा
तालमीचे कार्यकर्ते व नाट्य दिग्दर्शक, निर्माता किरणसिंह चव्हाण यांनी तर खेळाबरोबरच हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या परिवर्तन संस्थेने तर ‘ºहासपर्व’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे कोल्हापूरला २७ वर्षांनी अंतिम फेरीत असे यश मिळाले.