शिवाजी पूल दुचाकी; तीनचाकी वाहनांसाठी खुला, पावसाचा जोर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:46 PM2018-07-21T17:46:24+5:302018-07-21T18:00:08+5:30
शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर शनिवारी कमी राहिला. असे असले तरी तुडुंब भरलेल्या नद्यांमुळे पुराची स्थिती कायम आहे. पंचगंगेची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी ती ४१.५ फुटांवर राहिली.
यामुळे शिवाजी पुलावरून सकाळी १० वाजता दुचाकी व तीनचाकी वाहनांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग बंदच राहणार आहे. दूधगंगा धरणातून सकाळी एक हजार क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आल्याने या नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर दोन दिवसांपासून कमी राहिला आहे. जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली असून, राष्ट्रीय महामार्ग १, राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा १२, ग्रामीण १५ व इतर जिल्हा २० असे ५१ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असल्याने शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. चारचाकी व अवजड वाहनांसाठी मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघडझाप होऊन काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. शहरातील सुतारवाड्यासह सखल भागांतील पाणी अद्याप उतरलेले नाही.
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे शुक्रवारी (दि. २०) खुले झाल्याने येथून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दूधगंगा धरणातूनही सकाळी एक हजार क्युसेकने विसर्ग वाढविला; यामुळे एकूण पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून, दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत असून, दुपारी राजाराम बंधारा येथे ती ४१.५ फुटांवर राहिली.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत शनिवारी सकाळी आठपर्यंत १९.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
हातकणंगले (५.५०), शिरोळ (२.५७), पन्हाळा (२०.१४), शाहूवाडी (३१.००), राधानगरी (२५.८३), गगनबावडा (४५.५०), करवीर (१२.००), कागल (१२.५७), गडहिंग्लज (८.५७), भुदरगड (२२.४०), आजरा (३१.७५), चंदगड (१६.६६).