शिवाजी पूलप्रश्नी आत्मक्लेश-- नदीपात्रात उतरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:58 AM2017-10-08T00:58:36+5:302017-10-08T00:58:43+5:30
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अपूर्ण बांधकामाबाबत प्रशासनाकडून होणाºया दिरंगाईबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या अर्धवट पुलावर काळे निशाण फडकविले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या अपूर्ण बांधकामाबाबत प्रशासनाकडून होणाºया दिरंगाईबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या अर्धवट पुलावर काळे निशाण फडकविले. तसेच पंचगंगा नदीच्या पाण्यात उभे राहून पायातील जोडे स्वत:च्या डोक्यात मारून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले. निमित्त होते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीचे!
डिसेंबर २०१५ पासून या पर्यायी शिवाजी पुलाचे काम अर्धवट स्थितीत रेंगाळले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आश्वासने दिली. पुलाच्या कागदपत्रांची फाईल मंत्रालयात फिरत राहिली; पण पूल दोन वर्षांनंतरही अपूर्णच राहिला. आश्वासनाच्या गर्तेत अडकलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलने थांबविली होती; पण अखेर पुलाचे उर्वरित काम सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले. प्रथम सर्वपक्षीय कृती समितीचे सर्व कार्यकर्ते केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत अर्धवट बांधकाम झालेल्या पर्यायी शिवाजी पुलावर गेले. तेथे खुर्ची ठेवून स्वर्गीय माजी खासदार मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पुलावर काळे झेंडे लावून निषेधाच्या घोषणा दिल्या.
काही वेळाने सर्व कार्यकर्ते या पुलाच्या खाली पंचगंगा नदीच्या पाण्यात उतरून त्यांनी स्वत:चे पायातील जोडे स्वत:च्याच डोक्यात मारून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनात माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक पोवार, भगवान काटे, सुभाष देसाई, गणी आजरेकर, वसंतराव मुळीक, किशोर घाटगे, आदी सहभागी झाले होते.
‘लोकमत’चा पाठपुरावा
पर्यायी शिवाजी पुलाचे काम थांबल्यापासून ‘लोकमत’ने या बातमीसाठी पाठपुरावा केला आहे. बुधवारच्या अंकात (दि. ४ आॅक्टोबर) ‘शिवाजी पुलाला आता लोकसभेची मंजुरी आवश्यक’ या मथळ्याखाली पुलाच्या कामाची सद्य:स्थिती दर्शविली होती.
या पुलाच्या कामाबाबत अधिकाºयांकडून पाठपुरावा ठप्प असल्याची स्थिती दर्शविली होती. त्याचा परिपाक म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी या अर्धवट स्थितीतील पुलावर आत्मक्लेश आंदोलन केले. आता पुढील आंदोलन राष्टÑीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात करणार असल्याचे आंदोलनकांनी यावेळी जाहीर केले.
'शिवाजी पुलावर गर्दी; वाहतूक खोळंबली
पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाबाबत सर्वपक्षीय कृती समितीने केलेले अभिनव आंदोलन पाहण्यासाठी पुलावर नागरिकांची दुतर्फा गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ या पुलावरून जाणारी वाहतूक खोळंबली होती.