शिवाजी पुलाची सोमवारी ‘वर्कआॅर्डर’ निघणार जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : विधी विभागाच्या अहवालानंतर कामास येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:05 AM2018-05-11T01:05:29+5:302018-05-11T01:05:29+5:30
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाबाबत कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आंदोलनाची तीव्रता वाढवून जुना पूल वाहतुकीस बंद करण्याचा व जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या केलेल्या इशाºयानंतर गुरुवारी प्रशासनाला नमती भूमिका घेण्याची वेळ आली. गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाची वर्क आॅर्डर सोमवारी काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. तसेच विधी व न्याय विभागाच्या अहवालानंतर या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन कामाची गती वाढवू, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहितेही प्रमुख उपस्थित होते.
शिवाजी पुलाच्या कामासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत विधी व न्याय विभागाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा केली. त्यांचा अभिप्राय चार दिवसांत आल्यानंतर पुढील प्रक्रियेला गती येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी कृती समितीच्या शिष्ठमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. प्रारंभी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कृती समितीने आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केले.
निमंत्रक आर. के. पोवार यांनी, पुलाच्या कामाबाबत ठोस आश्वासन व काम सुरू करण्याची तारीख मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे सांगितले. यावेळी अधीक्षक संजय मोहिते यांनी, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हे पुलाचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बांधकाम करता येते याच्या तरतुदी तपासण्याचे काम सुरू आहे. विधी व न्याय विभागाचा अहवाल चार दिवसांत आल्यानंतर पुढे प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रयत्न करू, असे सांगितले.
जिल्हाधिकारी सुभेदार यांनी, विधी व न्याय विभागाच्या अहवालानंतर आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन पुलाच्या कामाची वर्कआॅर्डर काढू, असे आश्वासन दिले. उपस्थित राष्टÑीय महामार्ग विभागाच्या अधिकाºयांनीही अशी वर्कआॅर्डर देता येते, असे सांगितले. रजेवरील कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्याशी फोनवर संपर्क साधून सोमवारी कामावर हजर होऊन वर्कआॅर्डर काढण्याच्या सूचना केल्या.
कल्याणकरांचा फोन घेतला
राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे हे गेले तीन दिवस रजेवर आहेत. गुरुवारी बैठक सुरू असताना त्यांना जिल्हाधिकारी सुभेदार, पोलीस अधीक्षक
संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आदींनी मोबाईलवरून फोन केले; पण कांडगावे यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर कृती समितीचे सदस्य किसन कल्याणकर यांचा फोन त्यांनी उचलल्याने सारेच अचंबित झाले.दरम्यान, येथून पुढे पुलाच्या कामात अडचणी आणणाºयांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कृती समितीच्यावतीने आर. के. पोवार यांनी दिला.
कृती समितीकडून पुलाची पाहणी
कृती समितीच्या शिष्ठमंडळाने दुपारी १ ते ३ या वेळेत पुलावरून अवजड वाहतूक जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी ती रोखली. त्यावेळी तोरस्कर चौकापर्यंत वाहतूक खोळंबल्याने आर. के. पोवार आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी कृती समितीच्या सदस्यांना नोटिसा दिल्या होत्या.
पोवार-मोरे वादावादी
या बैठकीत प्रशासन फसवत असल्याचा आरोप कृती समितीच्या रमेश मोरे यांनी केला. त्यावरून आर. के. पोवार आणि मोरे यांच्यात बैठकीतच वादावादी झाली. त्यानंतर आर. के. पोवार यांनी सर्व सदस्यांचे मत आजमावले.