Shivaji University : शिवाजी विद्यापीठाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:33 PM2018-09-19T12:33:38+5:302018-09-19T12:38:50+5:30
आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कोल्हापूर : आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात नियमित आणि पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. संबंधित निकाल शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असल्याची माहिती, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
प्रलंबित असलेले निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे बुधवारी (दि. १२) विद्यापीठात बैठक घेऊन केली होती. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी निकाल रविवार (दि. १६)पर्यंत जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. प्रलंबित निकालाबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक काकडे यांनी सांगितले की, विद्यापीठातील परीक्षाविषयक कामकाजातून जुलै २०१७ मध्ये ‘एमकेसीएल’ प्रणाली बाहेर पडली.
या प्रणालीतून ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २३ हजार विद्यार्थ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिली. या दरम्यान ‘एमकेसीएल’च्या प्रणालीतून मिळालेल्या माहितीचे विद्यापीठाच्या प्रणालीमध्ये हस्तांतरण झाले नसल्याने या पुनर्परीक्षार्थींचा निकाल पूर्णपणे जाहीर करण्यात आला नव्हता.
आॅक्टोबर २०१७ मधील २३ हजार विद्यार्थ्यांपैकी १२ हजार विद्यार्थी मार्च २०१८ मध्ये पुनर्परीक्षार्थी झाले. माहितीचे हस्तांतरण झाल्याने विद्यापीठाने आॅक्टोबरमधील २३ हजार आणि मार्चमधील ११ हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे.
उर्वरित निकालांबाबत प्रक्रिया सुरू
ज्या परीक्षार्थींबाबतच्या माहिती उपलब्धतेमध्ये त्रुटी आहेत, अशा सुमारे १००० विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. ते लवकरात लवकर जाहीर करण्याबाबत परीक्षा मंडळाकडून प्रक्रिया सुरू असल्याचे काकडे यांनी सांगितले.