शिवाजी विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:20+5:302020-12-06T04:26:20+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईपर्यंत शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करीत असल्याचा निर्णय कुलगुरू ...
कोल्हापूर : मराठा आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईपर्यंत शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती स्थगित करीत असल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सकल मराठा समाजासमोर जाहीर केला. प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संतप्त झालेल्या सकल मराठाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कुलगुरूंची भेट घेऊन भावना मांडल्या.
बुधवारी (दि. ९) आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे या चर्चेअंती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ही प्रक्रिया रद्द करावी आणि निर्णय झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करावी असे ठरले. विद्यापीठाने एम. एस्सी. व तत्सम अभ्यासक्रम भाग १ आणि एम.ए., एम.कॉम., एलएल.एम. भाग १ या नियमित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ७ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार होती. सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, संजय वाईकर, चंद्रकांत बराले, वैभवराज भोसले, महादेव आयरेकर, दिलीप माने, राजेंद्र चव्हाण, गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आधीच मराठा समाजातील मुलांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यातच विद्यापीठाने अभ्यासक्रम प्रवेशाची जाहिरात शनिवारी वृत्तपत्रांत प्रसिद्धीस दिल्याने या आंदोलकांनी कुलगुरू शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
फोटो ०५१२२०२०-कोल-विद्यापीठ
फाेटो ओळ : कोल्हापुरात सकल मराठा समाजातर्फे शनिवारी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिले.