शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही लेखणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:57 PM2020-09-25T16:57:58+5:302020-09-25T17:00:15+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील सेवकांचे लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन शुक्रवारी सुरू राहिले. सेवकांनी विद्यापीठातील विविध अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा लक्षात घेता हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालकांनी केले असल्याचे संदेश सोशल मीडियावरून प्रसारित झाले आहेत.
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील सेवकांचे लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन शुक्रवारी सुरू राहिले. सेवकांनी विद्यापीठातील विविध अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा लक्षात घेता हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उच्च शिक्षण संचालकांनी केले असल्याचे संदेश सोशल मीडियावरून प्रसारित झाले आहेत.
सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती आणि शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवारपासून सुरू आहे.
दुसऱ्या दिवशी सेवकांनी कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर बसून लेखणी बंद आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले.