सोशल मीडियावर ‘शिवाजी विद्यापीठ’ हॅशटॅग मोहीम, टी शर्टलाही मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:54 PM2019-12-11T13:54:41+5:302019-12-11T14:08:54+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये. विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली विनंती मागे घ्यावी, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यात आली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये. विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली विनंती मागे घ्यावी, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही हॅशटॅग मोहीम राबविण्यात आली. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन- जर्नालिझम विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टी शर्टलाही मागणी आहे.
नामविस्तार झाल्यास या विद्यापीठाचा उल्लेख आद्य इंग्रजी अक्षरात केला जाईल; त्यामुळे प्रेरणादायी इतिहास डोळ्यांसमोरून हळूहळू झाकून जाण्याची भीती आहे; त्यामुळे विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा हॅशटॅग चालविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अनेक युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होऊन रात्री आठ ते नऊ या वेळेत संंबंधित हॅशटॅग चालवून या मोहिमेला पाठिंबा दिला.
शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव वर्षात मास कम्युनिकेशन विभागाने #माझंविद्यापीठ #शिवाजीविद्यापीठ' असं स्लोगन असलेले टी शर्ट विद्यार्थ्यांना दिले होते. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन- जर्नालिझम विभागामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विभागाचे स्वतंत्र टी शर्ट तयार केले होते. पुढे खिशाजवळ डिपार्टमेंटचा लोगो आणि पाठीवर 'माझं विद्यापीठ;शिवाजी विद्यापीठ' असं स्लोगन छापलं होतं. शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर हे स्लोगन सध्या भाव खात आहे.
अभिजित झाम्बरे-पाटील
माजी विद्यार्थी.